ग्लोबल गडचिरोली न्यूज
गडचिरोली, ता. ८ : बांग्लादेशात जिहादी कट्टरवाद्यांनी अस्थिरता निर्माण केली असून त्या देशातील हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन यांच्यासह अल्पसंख्याकांवर अत्याचार करण्यात येत आहेत. भारत सरकारने हस्तक्षेप करून हे अत्याचार थांबवावे, या मागणीसह अत्याचाराचा निषेध करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परीषद, अखिल भारतीय विद्यार्थी परीषदेच्या नेतृत्वात सकल हिंदू समाजाच्या वतीने जागतिक मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून मंगळवार १० डिसेंबर रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने शहरात जनआक्रोश न्याय यात्रा काढण्यात येणार आहे.
यासंदर्भात दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ५ ऑगस्ट २०२४ पासून बांग्लादेशात जिहादी कट्टरवाद्यांनी अस्थिरता निर्माण केली आहे. तसेच त्यांनी शेख हसीना सरकार उलथवून टाकले आहे. आता तर हिंदूंवरील हल्ले आणि अत्याचार अधिकच वाढले आहेत. आजवर ५० जिल्ह्यांत हिंदू अल्पसंख्यकांवर दोनशेहून अधिक हल्ले झाले असून त्यात ३५० पेक्षा अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत. हिंदू व्यावसायिक, हिंदू कलाकार, हिंदू नेत्यांच्या हत्या करण्यात आलेल्या आहेत. बांग्लादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात उभे झालेले इस्कॉनचे साधू चिन्मय कृष्णदास यांच्यावर राष्ट्रध्वजाच्या अवमानाचा खोटा आरोप लावून त्यांना अटक करण्यात आली आहे. देशातील सत्ता परीवर्तनानंतर हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन व अन्य अल्पसंख्यकांवर बांग्लादेशामधील जिहादी प्रवृंतीकडून हल्ले करण्यात येत आहेत. अल्पसंख्यकांची घरे, व्यावसायिक आस्थापनांची जाळपोळ आणि लूटमारीच्या अनेक घटना नोंदविल्या गेल्या आहेत, ज्यात मंदिरांमधील चोऱ्या आणि देवी-देवतांच्या विटंबनेच्या घटनांचाही समावेश आहे. महिलांवर बलात्कार, त्यांच्याशी लैंगिक दुर्व्यहार आणि त्यांच्या मृतदेहांची विटंबनाही केली जात आहे. दुर्दैवाने, या घटनांतील दोषी मोकाट फिरत आहेत आणि वैधानिक व शांततापूर्ण मार्गात लढा देणाऱ्या हिंदूंच्या धार्मिक नेत्यांनाच दोषी ठरविले जात आहे. हल्लेखोरांविरुद्ध कारवाई करण्यासाठी स्थानिक पोलिस बिचकत आहेत तर काही ठिकाणी ते गुंडांमध्ये सामील झाले आहेत. शांतीपूर्ण निदर्शकांवरच अवैध मागण्या करत असल्याचे आरोप लावले जाऊ लागले आहेत. गाझा, सिरीया, लेबनॉनमधील घटनांबद्दल चिंता व्यक्त करणारे बॉलिवूड कलाकार आणि आपल्या देशातील मानवाधिकारवादी बांग्लादेशातील हिंदूवरील अत्याचारांबद्दल मूग गिळून आहेत. हिंदूंवरील अत्याचार ताबडतोब थांबावे तसेच बांग्लादेशातील स्थिती रूळावर यावी आणि तेथील हिंदू समाजाचे जीवन सुकर, सुरक्षित व्हावे, यासाठी सकल हिंदू समाजातर्फे मंगळवारी जनआक्रोश न्याय यात्रा काढण्यात येईल. ही जनआक्रोश न्याय यात्रा स्थानिक शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणातून दुपारी २ वाजता देवकुळे पटांगणाकडे निघले. या पटांगणात यात्रेचे रूपांतर निषेध सभेत होईल. या सभेत प्रमुख वक्ते मार्गदर्शन करतील. त्यानंतर काही निवडक पदाधिकारी भारत सरकारसाठी लिहिलेले मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देतील. या जनआक्रोश न्याययात्रेत हिंदू समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक घिसूलाल काबरा, नगर संघचालक अॅड. नीळकंठ भांडेकर, जिल्हा संपर्कप्रमुख हेमंत राठी, प्रचार प्रमुख राकेश इनकने, विश्व हिंदू परीषदेचे नगरमंत्री आयुष न्यालेवार. अखिल भारतीय विद्यार्थी परीषदेचे विभाग प्रमुख प्रा. धर्मेंद्र मुनघाटे आदींनी केले आहे. बांगलादेश सरकारला भारत सरकारतर्फे हिंदू अत्याचाराच्या विरुद्ध कठोर इशारा दिला जावा, मानवाधिकारवादी संघटनांनी हिंदू आणि अन्य अल्पसंख्यकांवरील हल्ल्यांची, अत्याचारांची दखल घेऊन हा मुद्दा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर लावून धरावा, बांग्लादेशातील हिंदूंच्या जिविताची आणि संपत्तीची रक्षा तसेच महिलांवरील अत्याचारांच्या घटनांना पायबंद घातला जावा, यासाठी बांगलादेश सरकारने तातडीने पावले उचलावी, इस्काॅनचे साधू चिन्मय कृष्णदास यांची तुरुंगातून तत्काळ सन्मानाने मुक्तता करावी, हिंदू कलाकार, व्यावसायिक, उद्योगपती, खेळाडू, राजकीय नेते तसेच हिंदू मंदिरांना सुरक्षा पुरविली जावी, बांग्लादेशातील पाकिस्तानी जिहाद्यांच्या हस्तक्षेपाला पायबंद घालावा, संयुक्त राष्ट्रसंघात हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन व अन्य अल्पसंख्यकांवरील अत्याचाराचा मुद्दा उपस्थित केला जावा, बांग्लादेशातील हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन व अन्य अल्पसंख्य समाजांच्या रक्षणाची मागणी करणाऱ्या देशोदेशीच्या विविध आंदोलनांना सुरक्षा प्रदान केली जावी आदी मागण्यांसाठी देशभरात हे आंदोलन करण्यात येणार आहे.
—————————————–