तलवारीने केक कापणाऱ्या तरुणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

82

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली,ता. ८ : कुरखेडा तालुक्यातील गोठणगाव नाक्याजवळ अवैधरित्या तलवार बाळगून आरडाओरड करत त्या तलवारीने केक कापणे चार तरुणांना भोवले असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. तौसिफ रफीक शेख (वय ३६), अशफाक गौहर शेख (वय ३४), परवेज फिरोज पठाण ( वय २५), शाहरूख नसिम पठाण ( वय २५) रा. राणाप्रताप वाॅर्ड, कुरखेडा, ता. कुरखेडा जि. गडचिरोली, असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणांचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार जिल्हाधिकारी संजय दैने यांच्या आदेशान्वये गडचिरोली जिल्ह्यात २७ नोव्हेंबरप २०२४ पासून ते ११ डिसेंबर २०२४ रात्री १२ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे. असा आदेश असताना देखील ३० नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री १२ वाजात दरम्यान कुरखेडा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील गोठणगाव नाक्याजवळ काही तरुणांनी एकत्र येऊन गोंधळ व आरडाओरड करून अवैधरित्या तलवार बाळगून त्या तलवारीने केक कापल्याबाबतची गोपनीय माहिती कुरखेडा पोलिसांना मिळाली. त्या अनुषंगाने अधिकची चौकशी केली असता सोशल मिडीयावरील व्हिडीओमध्ये हे तरुण तलवारीचा वापर करून केक कापत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. तरुणांनी केलेल्या कायद्याच्या उल्लंघनामुळे तसेच शस्त्राचा वापर करून गंभीर स्वरुपाचा गुन्हा घडून येण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तलवारीसह या तरुणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कुरखेडा पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमध्ये एक धारदार टोकदार तलवार अंदाजे किंमत १५००रुपये जप्त करण्यात आली आहे. तसेच गुन्ह्यातील आरोपी तौसिफ रफीक शेख, अशफाक गौहर शेख, परवेज फिरोज पठाण, शाहरूख नसिम पठाण या चौघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध व व्हिडीओमधील इतर सर्व आरोपींविरुद्ध कलम 4/25 भारतीय हत्यार कायदा १९५९, सहकलम ३७ (१) (३), १३५ मपोका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याची कायदेशीर कार्यवाही कुरखेडा पोलिस स्टेशनच्या पोलिस उपनिरीक्षक वर्षा बोरसे करत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, अपर पोलिस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) श्रेणिक लोढा व कुरखेड्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनात कुरखेडा पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी तथा पोलिस निरीक्षक महेंद्र वाघ, पोलिस उपनिरीक्षक वर्षा बोरसे व पोलिस अंमलदारांनी पार पाडली.

————————————-