भिंतीवर महाकाव्य कोरणारे सावरकर जगातले एकमेव साहित्यिक : प्रा. सोमण

65

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ११ : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे एकूण व्यक्तीमत्व ३६० अंशाचे आहे. त्यामुळे त्यांचे साहित्यसुद्धा ३६० अंशाच्या परिघात आहे. असे कोणतेच विषय नाहीत ज्यावर त्यांचे लिखाण नाही. अगदी ‘गरमागरम चिवडा’ नावाचा त्यांचा एक ग्रंथ आहे, ज्यात ते तत्कालीन राजकीय व सामाजिक वैगुण्यांवर ताशेरे ओढतात. ज्यांना तब्बल ५० वर्षांची शिक्षा ठोठावली गेली आणि ज्यांनी केवळ एका लहानश्या लोखंडी तुकड्याने भिंतीवर महाकाव्य कोरले, असे जगातले ते एकमेव साहित्यिक आहेत, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते आणि मुंबई विद्यापीठ नाट्य कला अकादमीचे संचालक प्रा. योगेश सोमण यांनी केले.

गोंडवाना विद्यापीठात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर साहित्य अध्यासन केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे होते. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, व्यवस्थापन परिषद सदस्य गुरुदास कामडी, डॉ. संजय गोरे आणि अध्यासन केंद्राचे प्रस्तावक यश बांगडे मंचावर उपस्थित होते.

प्रा. सोमण पुढे म्हणाले, इंग्रजांनी भारताचा इतिहासच बदलण्याचा प्रयत्न केला. आजतागायत आपण त्याचे परिणाम भोगत आहोत. पण त्याहीवेळी ‘इतिहासाची सहा सोनेरी पाने’ या ग्रंथातून वीर सावरकरांनी देशाचा दैदीप्यमान इतिहास जागवला होता. १८५७ चे नॅरेटिव्ह बदलून त्यास स्वातंत्र्य लढा म्हणणारा हा महान वीर आहे. साने गुरूजी व विनोबा भावे यांनी नजरकैदेत साहित्य निर्मिती केली. पण वीर सावरकरांनी कोलू चालवून, हालअपेष्टा सहन करत महाकाव्य रचले, तेही भिंतीवर आणि जेव्हा ते पुसले जाणार असे माहित होताच त्या १० हजार ओळी मुखोद्गतही केल्या आणि आपल्यापर्यंत पोहचवल्या. शिवाय वीर सावरकर असे साहित्यिक आहेत, ज्यांच्या पुस्तकावर छापण्याआधीच बंदी आली. त्यांचे हस्तलिखितच जप्त केले गेले. अशा अफाट कर्तृत्वाला बदनाम करण्याचे काम अलीकडच्या काळात केले जाते, त्यांच्या विनंती पत्राला माफीपत्र म्हटले जाते, हे दुर्दैवाचे आहे असेही प्रा. सोमण म्हणाले. कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे म्हणाले की स्वातंत्र्यवीर सावरकरांचे साहित्य क्षेत्रात किती मोठे योगदान आहे, हे आवर्जून पुढे यावे. स्वातंत्र्ययोद्धा म्हणून आमच्यासाठी ते पुजनीय आहेत. पण त्यांच्या साहित्याने पिढी घडवली आहे आणि म्हणून आम्ही वीर सावरकर अध्यासन नव्हे, तर वीर सावरकरांचे साहित्य अध्यासन तयार केले आहे. गोंडवाना विद्यापीठाकडून याच नाही, तर सार्‍याच अध्यासन केंद्रांसाठी कधीही निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाहीसुद्धा त्यांनी दिली. प्रास्ताविक गुरूदास कामडी यांनी, तर अध्यासनाची माहिती यश बांगडे यांनी दिली. संचालन डॉ. सविता गोविंदवार यांनी केले. तर अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ. चैतन्य शिनखेडे यांनी आभार मानले. यावेळी उपस्थित व्यवस्थापन परिषद सदस्य स्वप्निल दोंतुलवार, प्रशांत दोंतुलवार, डॉ. प्रशांत मोहिते, नंदाजी सातपुते, सिनेट सदस्य संजय रामगिरवार, धमेंद्र मुनघाटे, स्वरूप तारगे आदींचे स्वागत करण्यात आले. पूनम आमवार आणि सोनाली पुराम यांनी गीत गायन केले.या कार्यक्रमादरम्यान अध्यासन केंद्रातर्फे आयोजित बोधचिन्ह स्पर्धेत राजन लांजेवार प्रथम, बन्सी कोठेवार द्वितीय, तर यश कुमार तृतीय आले. त्यांना अनुक्रमे ५ हजार, ३ हजार व २ हजार रुपये रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

—————————————