सख्ख्या मुलाने केली फसवणूक..पण पोलिसांनी दिली सौजन्याची वागणूक…वृद्धेला मिळाला न्याय

48

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

सिरोंचा,ता. १४ : वृद्धापकाळात मुलांनी आपल्या आई-वडीलांची काळजी घ्यायची असते. पण येथील एका लोभी मुलाने शेतजमिनीच्या लोभापोटी आपल्या आईचीच फसवणूक करून एका पोलिस पाटलाच्या मदतीने शेतजमिन विकून टाकली. यासंदर्भात वृद्ध महिलेने पोलिस स्टेशन येथे तक्रार केल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी तत्काळ आदेश दिल्याने तत्पर तपास करून या वृद्ध महिलेला न्याय मिळवू दिला आहे.

उतारवयात आपल्या आईची काळजी घेण्याऐवजी या मुलाने आपल्या आईला फसवून तिच्या नावे असलेली सामूहिक शेतजमीन एका पोलिस पाटलाच्या मदतीने विकून टाकली. जमिन विकताना त्याने आईला विश्वासात तर घेतले नाहीच पण मोठ्या बहिणीलादेखील याची माहिती दिली नाही. जागा रजिस्ट्री करायच्या वेळेस मुलाने आणि पोलिस पाटलाने त्या वृद्ध मातेला दवाखान्यात उपचारासाठी नेण्याच्या बहाण्याने बाहेर नेऊन रजिस्ट्रीच्या कागद पत्रावर तिच्या अंगठ्याचा छाप घेतला. काही दिवसांनी त्या वृद्ध मातेला आपली फसवणूक झाल्याचे कळले. ही गोष्ट तिने आपल्या मोठ्या मुलीला सांगीतली. त्यानंतर मुलगी आपल्या आईला घेऊन भावाकडे विचारणा करायला गेली असता आईला व मुलीला इतर खातेदारांप्रमाणे बरोबरीचा वाटा देण्याचे त्याने कबूल केले. सर्व काही सोपस्कार झाल्यावर आईने मुलाकडे आपल्या मोबदल्याची मागणी केली.मात्र मुलाने त्या दोघांनाही धुडकावून लावले. हा फसवणुकीचा प्रकार अंकीसा या गावात घडला. याप्रकरणी त्या वृद्ध आईने आपली मुलाकडून आणि पोलिस पाटलाकडून फसगत झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात १६ सप्टेंबर २०२४ रोजी दाखल केली. तेव्हापासून न्यायाची अपेक्षा बाळगणाऱ्या या वृद्ध मातेला अखेर न्याय मिळाला. अंकीसा येथील रहिवासी समक्का समय्या वेमुला (वय ७५) यांची रामांजपुर चक येथे सर्व्हे क्रमांक १३ ची वडिलोपार्जित सामूहिक शेतजमीन आहे. त्यावर मृत खातेदारांच्या वारसदारांची नावे नोंद करून मुलगा बापू वेमुला (वय ५५) आणि पेंटिपाका गावाचे पोलिस पाटील सडवली नर्सय्या वेमुला (वय ५५) या दोघांनी १ कोटी ५ लाख रुपयांना तेलंगणातील व्यापाऱ्यांना ही जमिन विकली. शासन दप्तरी ३९,६७००० रुपये दाखवून रजिस्ट्री केली. विकताना समस्त खातेदारांना दुय्यम निबंधक कार्यालयात बोलावून रजिस्ट्री करून घेतली.आलेल्या सर्व खातेदारांना त्यांच्या वाटेला येणारा मोबदला दिला. मात्र त्या वृध्द महिलेला आणि तिची मुलगी जयाबाई बोडगेवार यांना एक पैसासुद्धा दिला नाही. रजिस्ट्री करून झाल्यावर जेव्हा ही गोष्ट समोर आली. अखेर पोलिसांनी हे प्रकरण कौशल्याने हाताळत तिला न्याय मिळवून दिला. पोलिस विभागाच्या कर्तव्यदक्ष कार्यप्रणालीमुळे अर्जदार वृद्ध महिला समक्का वेमुला हिला तिच्या हक्काचा मोबदला मिळाला. याबद्दल तिने पोलिस अधीक्षक नीलोत्पल, सिरोंचा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक महेशकर तसेच संपूर्ण पोलिस विभागाचे आभार मानले आहेत. आपली फसवणूक सख्ख्या मुलानेच केल्याचे कळल्यावर वृद्ध समक्का वेमुलाला काहीच सुचेनासे झाले. शेवटी तिने नागेश इटेकर या पत्रकाराला आपली हकीकत सांगितली. या पत्रकाराने तिला सोबत घेऊन थेट गडचिरोली जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांची भेट घेतली. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सगळी माहिती जाणून घेत प्रकरणी स्वत: लक्ष घातले. त्यांनी लगेच स्थानिक पोलिस स्टेशनच्या ठाणेदारांना चौकशीचे आदेश दिले. त्यांच्या आदेशावरून स्थानिक पोलिस स्टेशनचे ठाणेदार चव्हाण यांनी तिची लेखी तक्रार नोंदवून घेतली आणि प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक महेशकर यांच्याकडे दिला. महेशकर यांनी पोलिस उपनिरीक्षक गणेश जंगले, पोलिस हवालदार राजू चव्हाण यांना सोबत घेऊन चौकशी केली असता संबंधित प्रकरणात पोलिस पाटील आणि मुलगा बापू वेमुला हे दोषी असल्याचे निष्पन्न झाले. हे स्पष्ट होताच पोलिसांनी त्यांना खाकीचा हिसका दाखवला तेव्हा दोघांनीही आपली चूक मान्य करून त्या वृद्ध मातेला मोबदला देण्याचे कबूल केले.अशा प्रकारे अखेर तिला न्याय मिळाला.

——————————————–