बंधाऱ्यासाठीच्या लोखंडी प्लेट्स चोरणारा चोर निघाला नागपूरचा

55

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली,ता. २१ : येथून जवळच असलेल्या वसा येथील कोलांडीनाला बंधाऱ्यामध्ये पाणी अडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या एकूण ४७ लोखंडी प्लेट्स (पल्ले) चोरणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे गडचिरोलीत चोरी करणारा हा चोर नागपूरचा आहे. शिवाय त्याला अमरावती जिल्ह्यातही अटक झाली आहे. कुलदीपसिंग दर्शनसिंग जुनी (वय २७), रा. बिडगाव चेरी कंपनीजवळ, नागपूर ता. जि. नागपूर, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तसेच चोरीस गेलेला एकूण २ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

प्राप्त माहितीनुसार २६ नोव्हेंबर २०२४ रोजी आरमोरी पोलिस स्टेशन हद्दीतील वसा परीसरातील कोलांडी नाला येथील बंधाऱ्यामधील पाणी अडविण्यासाठी वापरण्यात येणारे १७ नग लोखंडी प्लेट्स (पल्ले) व त्यापासून ५०० मीटर अंतरावरील ३० नग लोखंडी प्लेट्स (पल्ले) अंदाजे किंमत २ लाख ३५ हजार किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता. त्यावरून आरमोरी पोलिस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास वरीष्ठांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक प्रताप लामतुरे यांनी सुरू केला केला. अशाच प्रकारचा गुन्हा अमरावती जिल्ह्यातील वरूड पोलिस स्टेशन येथे झाल्याची व या गुन्ह्यामधील आरोपी अटकेत असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक लामतुरे यांना मिळाली. त्यांनी वरूड पोलिस स्टेशनशी संपर्क साधून आरोपी कुलदीपसिंग जुनी याला ताब्यात घेऊन कौशल्यपुर्वक तपास केला. कुलदीपसिंह जुनी याने वसा येथील कोलांडीनाला बंधाऱ्यातील दोन्ही ठिकाणांवरील लोखंडी प्लेट्स (पल्ले) चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून ४७ पल्ले एकून २ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. न्यायालयाने आरोपी जुनी याला ३० डिसेंबर २०२४ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, गडचिरोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी सूरज जगताप, आरमोरीचे पोलिस निरीक्षक कैलास गवते यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक प्रताप लामतुरे, पोलिस हवालदार विशाल केदार, पोलिस अंमलदार सुरेश तांगडे, पोलिस अंमलदार हंसराज धस आदींनी केली.

———————————-