१५ लाख ६० हजार१९४ रुपयांच्या दारू बाटल्यांचा चुराडा करून घातले खड्ड्यात

60

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता.२९ : स्थानिक गडचिरोली पोलिस स्टेशन येथे दाखल एकूण ८७ गुन्ह्यांमधील महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये जप्त करण्यात आलेला अवैध दारूचा मुद्देमाल शुक्रवार (ता.२८) नष्ट करण्यात आला.  

सविस्तर वृत्तानुसार न्यायालय व अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गडचिरोली यांच्या परवानगीने शुकवारी गडचिरोलीचे पोलिस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांनी राज्य उत्पादक शुल्क, गडचिरोली विभागाचे दुय्यम निरीक्षक चंदन भगत व शु. के. चौधरी यांच्यासह गडचिरोली पोलिस स्टेशनच्या हद्दीतील विविध दारूबंदी गुन्ह्यांतील जप्त मुद्येमाल नष्ट केला. यात देशी दारूच्या ९० मिली मापाच्या १४०२७ प्लास्टिक बॉटल, विदेशी दारूच्या २००० मिली मापाच्या ५५ प्लास्टिक बॉटल, विदेशी दारूच्या ७५० मिली मापाच्या २९ काचेच्या बॉटल, विदेशी दारुच्या ३७५ मिली मापाच्या ७१ काचेच्या बॉटल, विदेशी दारूच्या १८० मिली मापाच्या ७०९ काचेच्या बॉटल, विदेशी दारूच्या ९० मिली मापाच्या ४९ काचेच्या बॉटल, बियरच्या ६५० मिली मापाच्या ९ काचेच्या बॉटल, बियरच्या ५०० मिली मापाच्या २८७ टिनाचे कॅन याप्रमाणे एकूण १५ लाख ६० हजार १९४ रुपयांचा मुद्देमाल दोन पंचासमक्ष जेसीबीच्या साहाय्याने १५ बाय १५ फुटांचा खोल खड्डा खोदून रोड रोलरच्या सहाय्याने कडक व मुरमाड जागेवर मुद्देमाल पसरवून काचेच्या व प्लास्टिकच्या बॉटल्सचा चुरा करण्यात आला. त्यानंतर काचेचा चुरा व प्लास्टिकच्या चेपलेल्या बॉटल्स जेसीबीच्या साहाय्याने खड्डयात टाकून खड्डा पूर्ववत बुजविण्यात आला. या मुद्येमालाची विल्हेवाट लावताना पर्यावरणाची हानी होणार नाही याची पूर्णपणे दक्षता घेण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश तसेच गडचिरोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी. सूरज जगताप यांचे मार्गदर्शनात प्रभारी अधिकारी रेवचंद सिंगनजुडे व पोलिस हवालदार चंद्रभान मडावी यांनी पार पाडली.