गोंडवाना विद्यापीठाचा राज्य कौशल्य विकास सोसायटीशी सामंजस्य करार

108

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली,ता. ३ : गोंडवाना विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी यांच्यात कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी ही महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नवोपक्रम विभागाअंतर्गत कार्यरत आहे. या करारामुळे गोंडवाना विद्यापीठात अल्पकालीन कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सोसायटीमार्फत प्रयत्न केले जातील. या कराराचा मुख्य उद्देश राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात नमूद केलेल्या कौशल्य घटकांचा लाभ घेणे, तसेच विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत वाढ करण्यासाठी कौशल्य विकासाचे अल्पकालीन प्रशिक्षण देणे हा आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत विविध कौशल्य अभ्यासक्रमांसाठी योग्य प्रमाणात श्रेयांक (क्रेडिट्स) प्रदान करण्यात येणार असून ते अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये हस्तांतरितही करण्यात येतील. हा सामंजस्य करार पुढील पाच वर्षांसाठी करण्यात आला आहे. याप्रसंगी सोसायटीचे प्रतिनिधी अंकुश वाशिमकर व अभय देशमुख, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, नवसंशोधन, नवोपक्रम व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. मनिष उत्तरवार, डॉ. कृष्णा कारु तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली येथील सहाय्यक आयुक्त योगेंद्र शेंडे उपस्थित होते. या करारामुळे गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना दर्जेदार कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून अधिकाधिक रोजगाराच्या संधी प्राप्त होतील, असा विश्वास योगेंद्र शेंडे यांनी व्यक्त केला

.