डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भोलूभाऊ सोमनानी मित्र परिवारातर्फे पाणपोईचे लोकार्पण

325

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १५ : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपत भोलूभाऊ सोमनानी यांच्या मित्र परिवारातर्फे वैरागड येथील इंदिरा गांधी चौकात शुद्ध व थंड पाण्याची पाणपोई उभारण्यात आली. या पाणपोईचे उद्घाटन सेवानिवृत्त शिक्षक श्री. रंगारी आणि सेवानिवृत्त प्राध्यापक श्री. निकोसे यांच्या हस्ते पार पडले.

कार्यक्रमाला भोलूभाऊ सोमनानी, शीतल सोमनानी यांच्यासह गावातील विविध मान्यवर, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावकऱ्यांसाठी उपयुक्त असा हा उपक्रम तीव्र उन्हाळ्यातील तहानलेल्या सर्वसामान्यांना दिलासा देणारा ठरला आहे.उद्घाटनप्रसंगी मान्यवर म्हणाले की, या पाणपोईद्वारे गावकऱ्यांना शुद्ध व थंड पाणी उपलब्ध करून देण्याचा उद्देश असून हा उपक्रम केवळ सेवा नव्हे तर समाजाप्रती असलेली जबाबदारी दर्शवतो. भोलूभाऊ सोमनानी यांच्या सामाजिक जाणीवेचे गावकऱ्यांनी मनापासून कौतुक केले. सत्कार्य हेच खरे अभिवादन, असे सांगत अनेकांनी त्यांचे आभार मानले. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या तरुण पिढीसाठी हा उपक्रम आदर्शवत ठरेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.