आत्मसमर्पित माओवाद्यांना विकास, कौशल्याची संजीवनी देणारा प्रोजेक्ट सुरू

105

गडचिरोली, ता. १४ : शासनाने सन २००५ पासून जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलिस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकूण ७०४ माओवाद्यांनी गडचिरोली पोलिस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन २०२२ ते आतापर्यंत एकूण ५५ जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. तसेच सन २०२५ साली आतापर्यंत एकूण २२ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. या आत्मसमर्पित माओवादी सदस्यांचा सर्वंकष विकास होऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये सामिल होणे सुसह्र व्हावे यासाठी गडचिरोली पोलिस दलाकडून वेळोवेळी विविध उपक्रम राबविले जात असतात. सोमवार (ता. १४) पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या संकल्पनेतून याच सर्व उपक्रमांचे एकात्मिकपणे सुसूत्रीकरण करून गडचिरोली पोलिस दलाच्या वतीने नावीन्यपूर्ण अशा “प्रोजेक्ट संजीवनीची” सुरुवात करण्यात आली.

प्रोजेक्ट संजीवनीअंतर्गत आत्मसमर्पणानंतर केंद्र व राज्य शासनाच्या योजनेअंतर्गत मिळत असलेल्या बक्षीस रकमेचे सुलभ वितरण, भूखंड मिळवून देऊन प्रधानमंत्री आवास योजना व शबरी आवास योजना अंतर्गत गृहप्रकल्प उभारणे, आधारकार्ड, पॅनकार्ड, रेशन कार्ड, जॉब कार्ड आदी ओळखपत्रे उपलब्ध करून देणे, स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण – मोटार ड्रायव्हिंग, शिवणकाम, ब्युटीपार्लर, पशुपालन , लॉयड्स मेटल्स अॅण्ड एनर्जी लि. सारख्या नामांकित कंपन्यांमध्ये वेल्डर, टेक्निशियन, ऑपरेटर आदी प्रशिक्षण व रोजगाराची संधी, महिलांच्या सक्षमिकरणासाठी महिला बचत गटांची स्थापना, वैद्यकीय मदत – डोळ्यांच्या उपचारासाठी “ऑपरेशन रोशनी”, तसेच नसबंदी रिओपनिंग शस्त्रक्रिया, मानसिक व सामाजिक विकासासाठी समुपदेशन, मानसोपचार व ध्यान शिबिरे, आत्मसमर्पित माओवादी सदस्यांकरिता सामूहिक विवाह सोहळा व इतर योजनांची अंमलबजावणी केली जाणार आहे. प्रोजेक्ट संजीवनीच्या प्रारंरंभप्रसंगी पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते ४ आत्मसमर्पित माओवादी सदस्यांकरिता बनविण्यात येणा­या सर्व सोयी-सुविधांनी सुसज्ज अशा स्वतंत्र ४ रो-हाऊस बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी सूरज जगताप, प्रभारी पोलिस उप-अधीक्षक (गृह) विनोद चव्हाण, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण फेगडे, पोलिस निरीक्षक निखिल फटींग, गडचिरोली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे तसेच विविध शाखांचे पोलिस अधिकारी व अंमलदार आणि ५० पेक्षा अधिक आत्मसमर्पित माओवादी सदस्य उपस्थित होते. पोलिस अधीक्षक नीलोत्पल म्हणाले की, प्रोजेक्ट oóo आत्मसमर्पित माओवादी संदस्यांना नवजीवनाची संधी मिळून समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने सहभागी होता येईल. कार्यक्रमासाठी आत्मसमर्पण शाखा गडचिरोलीचे प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र पिवाल व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

———-