ग्लोबल गडचिरोली न्यूज
गडचिरोली, ता. १७ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षानंतर प्रथमच गडचिरोली पोलिस दलाच्या प्रयत्नाने व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सहकार्याने मंगळवार (ता. १७) तुमरकोठी ते अहेरी मार्गावर बससेवा सुरू करण्यात आली आहे.
भामरागडपासून सुमारे ३० कि.मी. व अहेरी पासून सुमारे १०० कि.मी. अंतरावर असलेल्या तुमरकोठी येथील नागरिकांना तहसिल किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी सहज प्रवास करता यावा, यासाठी गावात प्रथमच बस आल्यामुळे गावातील नागरिकांनी पारंपरिक वाद्य वाजवत, नृत्य करत वाजत गाजत बसचे स्वागत केले. यासोबतच शाळेतील लहान मुलांनी तिरंगा घेऊन बसचे स्वागत केले. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनात तुमरकोठी पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक गोरखनाथ सुरासे यांनी या बस सेवेचे उद्घाटन केले. तसेच हिरवा झेंडा दाखवून बस मार्गस्थ केली व ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी ग्रामपंचायत कोठीच्या सदस्य भाग्यश्री लेकामी, गावपाटील रामजी मट्टामी, चिन्ना मट्टामी, राजू गावडे, तुमरकोठी जिल्हा परीषद शाळेचे शिक्षक रामा लेकामी यांच्यासह एकूण ३०० नागरिक उपस्थित होते. तुमरकोठी – कोठी – भामरागड – अहेरी या मार्गावर सुरू झालेल्या या बस सेवेमुळे या भागातील ४५० ते ५०० नागरिकांना लाभ होत त्यांचे जीवनमान सुसह्र होणार आहे. बससेवा सुरू झाल्यामुळे गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय होऊन यामुळे गावातील नागरिकांचीही नेहमीची पायपीट वाचणार आहे. या मार्गावरील एस.टी बसच्या सुविधेमूळे ग्रामस्थांना वर्षभर सहज प्रवास करता येणे शक्य होईल. सामान्य नागरिकांच्या दळण-वळणाच्या मूलभूत प्रश्नावर उपाय करण्यासाठी गडचिरोली पोलिस दलाच्या संरक्षणात जिल्हाभरामध्ये एकूण ५५९ मोबाईल टॉवर्सची उभारणी करण्यात आली असून, एकूण ४२४ कि.मी. लांबीच्या रस्त्याचे आणि ६५ पुलांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. मागील एक वर्षात गडचिरोली पोलिस दलाच्या प्रयत्नाने गट्टा (जा.) – गर्देवाडा – वांगेतुरी, कटेझरी ते गडचिरोली आणि मरकणार ते अहेरी, आंबेझरी ते गडचिरोली मार्गावर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच बससेवेचा प्रारंभ करण्यात आला असून या उपक्रमांच्या माध्यमातून गडचिरोली पोलिस दल नागरिकांचे जीवनमान सुसह्र होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलिस अधीक्षक अहेरी कार्तिक मधीरा, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज, पोलिस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी, हेडरी योगेश रांजणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सीआरपीएफ १९१ बटालियन एफ कंपनीचे पोलिस निरीक्षक होनप्पा, पोलिस स्शनटे तुमरकोठीचे प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक गोरखनाथ सुरासे, आशिष मेश्राम व इतर अधिकारी आणि अंमलदार यांच्या प्रयत्नांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सहकार्याने बससेवा सुरू करण्यात आली.
——————————-











