ग्लोबल गडचिरोली न्यूज ,
गडचिरोली, ता.२८ : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचे काटेकोर अनुसरण करताना त्यांच्या विचारांचा आजीवन प्रसार करणारे ज्येष्ठ समाजसेवक, विविध सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक संस्थांचे मार्गदर्शक डॉ. शिवनाथ कुंभारे यांचे मंगळवार (ता. २८) दुपारी ११ वाजता गडचिरोली येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी ते ७९ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे गडचिरोली जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
डॉ. शिवनाथ कुंभारे हे अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे माजी जिल्हा सेवाधिकारी होते. मनमिळावू स्वभाव, निस्वार्थ वृत्ती आणि कार्यतत्परता यामुळे त्यांनी समाजात वेगळी ओळख निर्माण केली होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या परिवर्तनवादी व मानवतावादी विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर अविरत प्रयत्न केले. त्यांनी कर्मयोगी तुकारामदादा गीताचार्य (अड्याळ टेकडी) तसेच पद्मश्री अण्णा हजारे (राळेगण सिद्धी) यांच्या सोबत अनेक वर्षे सामाजिक कार्यात सहभाग घेतला. दुर्गम व नक्षलग्रस्त आदिवासी भागात जाऊन त्यांनी लोकसेवेचे व्रत जपले आणि असंख्य गरजू लोकांना आधार दिला. वैद्यकीय सेवेबरोबरच लोककल्याणासाठी त्यांनी आयुष्य वेचले. डॉ. शिवनाथ कुंभारे हे केवळ डॉक्टर नव्हते, तर ते गरिबांचे खरे सेवक होते. “समाजसेवा ही बोलण्यातून नाही, तर कृतीतून करायची असते” हे त्यांनी आपल्या आयुष्यभराच्या कार्यातून दाखवून दिले. त्यांच्या दवाखान्यात गरीब, गरजू आणि आजारी लोकांना अत्यल्प शुल्कात किंवा अनेकदा मोफत उपचार मिळत असत. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील असंख्य कुटुंबांसाठी त्यांचे हॉस्पिटल आशेचे केंद्र ठरले होते. गडचिरोली येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते. तसेच राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद, गडचिरोली सायकल स्नेही मंडळ, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन समिती, झाडीबोली साहित्य मंडळ, गडचिरोली जिल्हा दारूबंदी आंदोलन आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांसारख्या संस्थांमध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या पश्चात एक मुलगा डॉ. अनंता कुंभारे, सुन, तीन मुली, जावई, नातवंडे आणि मोठा आप्तपरिवार असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सायंकाळी ६ वाजता गडचिरोली येथील कठाणी नदी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. डॉ. शिवनाथ कुंभारे यांच्या निधनाने गडचिरोली जिल्ह्याने एक निस्वार्थी, सेवाभावी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व गमावले आहे.
राष्ट्रसंतांचा प्रत्यक्ष सहवास…
डाॅ. शिवनाथ कुंभारे हे मुळचे आरमोरी येथील असून त्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा प्रत्यक्ष सहवास मिळाला होता. राष्ट्रसंत भजन, कीर्तन, जनजागृतीनिमित्त भारतभर फिरायचे. या दरम्यान ते आरमोरीला आले असता अनेकदा डाॅ. कुंभारे यांच्या घरी थांबायचे. एकदा राष्ट्रसंतांनी डाॅ. कुंभारे यांना आपल्या जवळ बसवून अतिशय प्रेमानं सांगितलं की, “बेटा शिवनाथ, आयुष्यात उत्तुंग यश मिळव. पण समाजातील रंजल्या, गांजल्याची सेवा हेच आपल्या आयुष्याचे ध्येय ठेव.” राष्ट्रसंतांचा हाच संदेश डाॅ. कुंभारे यांनी गुरूमंत्र मानत आयुष्यभर जपला. वैद्यकीय शिक्षणातील उच्च पदवी प्राप्त करूनही त्यांनी महानगराला मोठे रुग्णालय उभारण्याचा विचारही मनात आणला नाही. गडचिरोली जिल्ह्याला आपली कर्मभूमी मानत त्यांनी आयुष्यभर समाजातील रंजल्या-गांजल्यांची मनोभावे सेवा करताना राष्ट्रसंतांच्या विचारांची असंख्य काळजात पेरणी केली.
प्रत्येकाला द्यायचे ग्रामगीता…
डाॅ. शिवनाथ कुंभारे यांची राष्ट्रसंतांचे विचार व साहित्याप्रती अढळ निष्ठा होती. त्यांच्याकडे राष्ट्रसंतांच्या विविध ग्रंथांचा कायम साठा असायचा. त्यांनी कुणी भेटायला गेले किंवा ते कुणाला भेटले तर त्या व्यक्तीला राष्ट्रसंतांनी लिहिलेला ग्रामगीता हा ग्रंथ आवर्जून भेट द्यायचे. यासोबत राष्ट्रसंतांची इतरही पुस्तके द्यायचे. विशेष म्हणजे संपूर्ण ग्रामगीता त्यांना मुखोद्गत होती. ग्रामगीतेतील प्रत्येक ओवी आचरणात आणत राष्ट्रसंतांच्या विचारांचा हा पाईक नावाने शिवनाथ असला तरी प्रत्यक्षात लोकनाथ (लोकांचा नाथ, त्यांना सतत मदत करणारा) म्हणूनच जगला. त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली, विनम्र अभिवादन !
—————————————-










