ग्लोबल गडचिरोली न्यूज
गडचिरोली, ता. ५ मे २०२६ : गडचिरोली जिल्ह्यातील नवेगाव (मुरखळा) येथे भर नागरी वस्तीत प्रस्तावित प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्पाविरोधात स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. वार्ड क्रमांक ३ मधील नागरिकांनी राज्याचे राज्यमंत्री तथा सह-पालकमंत्री आशिष जयस्वाल यांना निवेदन देत या प्रकल्पास तात्काळ स्थगिती देण्याची मागणी केली आहे.
निवेदनानुसार, ग्रामपंचायत नवेगाव (मुरखळा) यांनी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सन २०२२-२३ मध्ये सर्वे क्रमांक ४८ येथे घनकचरा डंपिंग यार्ड व कचरा विलगीकरण शेड उभारले होते. मात्र, या ठिकाणाहून होणाऱ्या दुर्गंधी व प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त झाले होते. सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर सुमारे ८ महिन्यांपासून हे यार्ड बंद ठेवण्यात आले आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या परिसरात आधीच सुमारे १००० टन प्लास्टिक कचरा जमिनीत गाडण्यात आला असून त्यामुळे भूगर्भातील पाणी व पर्यावरण दूषित होत आहे. अशा स्थितीत त्याच ठिकाणी खासगी कंपनीमार्फत नव्या प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्पाची प्रक्रिया सुरू असल्याने संताप व्यक्त होत आहे.
सदर प्रकल्प हा नागरी वस्तीत, तलावाच्या काठावर व सार्वजनिक पोलीस मैदानाच्या शेजारी प्रस्तावित असल्यामुळे वायू, जल व ध्वनी प्रदूषणाचा मोठा धोका निर्माण होईल, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. प्लास्टिक प्रक्रियेमुळे डायॉक्सिन व फ्युरानसारखे घातक वायू निर्माण होऊन कर्करोग, श्वसन व त्वचारोगांचा धोका वाढू शकतो, असेही निवेदनात नमूद आहे.
तसेच, मायक्रोप्लास्टिकमुळे जमिनीची सुपीकता घटणे, पिण्याचे पाणी दूषित होणे आणि तलावातील जलचरांवर परिणाम होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
नागरिकांनी यापूर्वी जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व संबंधित विभागांकडे अनेकदा तक्रारी केल्या असल्या तरी अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. तसेच, स्थानिक नागरिकांची संमती न घेता प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
निवेदनात पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६, घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ व प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम २०१६ यांच्या तरतुदींचा उल्लेख करून या प्रकल्पाची अंमलबजावणी नियमबाह्य असल्याचा दावा करण्यात आला आहे. मार्गदर्शक सूचनांनुसार अशा प्रकल्पांना लोकवस्तीपासून किमान ५०० मीटर अंतर आवश्यक असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
नागरिकांच्या प्रमुख मागण्या :
प्रस्तावित प्रकल्पास तात्काळ स्थगिती द्यावी,सर्व पर्यावरणीय अहवाल व परवानग्या सार्वजनिक कराव्यात,भविष्यातील प्रकल्प लोकवस्तीपासून किमान ५०० मीटर अंतरावर उभारावेत, सदर ठिकाणी प्रकल्पास मंजुरी देऊ नये.
निवेदन देताना मनिषा मडावी , भूषणा खेडेकर , राणी गोपशेट्टीवार , स्नेहा मेश्राम आदी उपस्थित होते. योग्य वेळी कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.










