गडचिरोली पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना ठोकल्या बेड्या

211

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १० : येथील गडचिरोली पोलिसांनी अवघ्या १२ तासात तपास करत खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद केले आहे.

प्राप्त माहितीनुसार ८ मे २०२६ ला सायंकाळी मेंढा ता. गडचिरोली, जि. गडचिरोली येथे अक्षय भानारकर याच्या राहत्या घरी शामकला सुखदेव किरंगे रा. हिडदा, ता. कुरखेडा हिचा मृतदेह आढळून आला होता. यावरून गडचिरोली पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता. गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेऊन त्यास अटक करणे हे गडचिरोली पोलीसांपुढे मोठे आव्हान होते. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर पोलिस अधीक्षक एम.रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली हा गुन्हा उघडकीस आणून आरोपीस अटक करण्याकरिता गडचिरोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वात गडचिरोली पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदारांची तपास पथके तयार करण्यात आली होती. हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याने तपास पथकांनी अतिशय वेगाने तपासाची चक्रे फिरवून केवळ तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयीत सुदामा रामभाऊ चौधरी याला चंद्रपुर येथून ताब्यात घेतले होते. गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याची अधिक विचारपूस केली असता, त्याने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने पूर्व वैमनस्यातून शामकला किरंगे हिचा खून केल्याचे निष्पन्न झाले. यावरून रविवार (ता. १०) सुदामा रामभाऊ चौधरी ( वय ३३, रा. शिरसगाव, ता. संगमनेर जि. अहिल्यानगर) यास त्याचा साथिदार चेतन धर्माराव खोब्राागडे रा. इंदिरानगर, ता. जि. गडचिरोली याच्यासह मोठ्या शिताफीने अटक करण्यात आली. एक विधीसंघर्षीत बालकास देखील ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी सुदामा रामभाऊ चौधरी, चेतन धर्माराव खोब्राागडे यांना न्यायालयासमक्ष हजर करण्याची तजवीज करण्यात आली असून विधीसंघर्षीत बालकास बाल न्याय मंडळासमक्ष हजर करण्यात येणार आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास गडचिरोली पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक अतुल तराळे करत आहेत.

गुन्ह्यात केवळ तांत्रिक पुराव्याच्या मदतीने आणि गोपनीय माहितीच्या आधारावर आरोपींना निष्पन्न करुन त्यांना अटक करून अत्यंत गंभीर गुन्हा उघडकीस आणण्यास गडचिरोली पोलिस दलास यश आले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज, गडचिरोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण फेगडे, सहायक पोलिस निरीक्षक भगतसिंग दुलत, गडचिरोली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विनोद चव्हान, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी देशमुख, पोलिस उपनिरीक्षक माधुरी मिसाळ, पोलिस उपनिरीक्षक भावना राऊत व अंमलदारांनी पार पाडली. गडचिरोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वात गडचिरोली पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली येथील अधिकारी व अंमलदारांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलिस अधीक्षक एम. रमेश यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

—————————————