०८ जहाल माओवादी अटकेत, तब्बल ५१ शस्त्रे व ६५ लाखांहून अधिक रोकड जप्त
ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली , ता . १६ : गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळीला मोठा धक्का देत गडचिरोली पोलीस दल आणि सीआरपीएफने संयुक्त कारवाईत “ऑपरेशन अंतिम प्रहार” अंतर्गत ०८ जहाल माओवाद्यांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या माओवाद्यांमध्ये दोन डीव्हीसीएम, दोन पीपीसीएम आणि चार सदस्य पदावरील माओवादीांचा समावेश आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली असून जिल्ह्यातील माओवादी हालचाली जवळपास संपुष्टात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेदरम्यान तेलंगणा राज्यातून ०४, मौजा कुमनार येथून ०२ आणि मौजा नैताळा येथून ०२ अशा एकूण ०८ माओवाद्यांना ताब्यात घेण्यात आले.
फोदेवाडा चकमकीतील आरोपी अटकेत
दि. १३ मे २०२६ रोजी तेलंगणातील रुकमापूर रेल्वे स्थानकावर संशयित हालचाल करणाऱ्या तीन पुरुष आणि एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत ते पोलीस अभिलेखावरील सक्रिय माओवादी असल्याचे निष्पन्न झाले. त्यामध्ये जयराम मोंगे गावडे, मुकेश ऊर्फ लच्छु लक्कु अवलाम, विजय ऊर्फ मंगडू हुंगा तामो आणि रजिता ऊर्फ शामबत्ती कोसा मडावी यांचा समावेश आहे.
या चौघांचा दि. ०७ फेब्रुवारी २०२६ रोजी फोदेवाडा जंगल परिसरात झालेल्या चकमकीत एका सी-६० जवानाच्या हत्येत प्रत्यक्ष सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानंतर पोलिसांनी फोदेवाडा परिसरात शोधमोहीम राबवून .३०३ रायफल, ०२ बारा बोअर बंदुका, जिवंत काडतुसे आणि माओवादी साहित्य जप्त केले.

कुमनारमध्ये डीव्हीसीएम दाम्पत्य अटकेत
दि. १४ मे रोजी मौजा कुमनार येथे अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधिरा यांच्या नेतृत्वाखाली शोधमोहीम सुरू असताना दोन सशस्त्र माओवादी पळून जाण्याचा प्रयत्न करताना आढळले. पोलिसांनी त्यांना शिताफीने पकडले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राजु ऊर्फ मंगडू मंगलु वेको (डीव्हीसीएम, कंपनी क्र. १०) आणि त्याची पत्नी जनी ऊर्फ नगी उंगाल येमला (पीपीसीएम, कंपनी क्र. १०) यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून ०१ एके-४७ रायफल, ०१ .३०३ रायफल, ०१ बारा बोअर रायफल आणि माओवादी साहित्य जप्त करण्यात आले.
यानंतरच्या चौकशीतून गुंडेनूर जंगल परिसरात लपवून ठेवलेला मोठा शस्त्रसाठा आणि रोकड जप्त करण्यात आली. यात ०१ एसएलआर एलएमजी, ०१ इन्सास एलएमजी, ०३ एके-४७, ०३ एसएलआर, ०२ इन्सास रायफल, .३०३ रायफल, बीजीएल लाँचर, ३५८ जिवंत काडतुसे आणि तब्बल ६३ लाख ८४ हजार रुपयांची रोकड आढळून आली.

नैताळा परिसरातून महिला माओवादी ताब्यात
त्याच दिवशी मौजा नैताळा येथे अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी. यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मोहिमेत दोन महिला माओवादी ताब्यात घेण्यात आल्या. त्यांची ओळख ज्योती ऊर्फ अकिला ऊर्फ समिता पोटावी (डीव्हीसीएम) आणि आमती ऊर्फ आयती ऊर्फ संध्या इडमा पोडीयाम (सदस्य, कंपनी क्र. १०) अशी झाली. त्यांच्याकडून ०१ एसएलआर रायफल, ०१ बारा बोअर रायफल, ०१ सिंगल शॉट रायफल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. पुढील शोधमोहीमेत नैताळा जंगलातून ०१ इन्सास रायफल, .३०३ रायफल, ०८ बारा बोअर रायफल, डेटोनेटर, बीजीएल सेल आणि मोठा दारुगोळा हस्तगत करण्यात आला.

६४ लाखांचे बक्षीस जाहीर
अटक करण्यात आलेल्या आठही माओवाद्यांवर महाराष्ट्र शासनाने एकूण ६४ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. त्यामध्ये राजु वेको आणि ज्योती पोटावी यांच्यावर प्रत्येकी १६ लाख रुपये, जनी येमला व जयराम गावडे यांच्यावर प्रत्येकी ०८ लाख रुपये तर उर्वरित चार माओवाद्यांवर प्रत्येकी ०४ लाख रुपयांचे बक्षीस होते.
जिल्ह्यात अभिलेखावरील एकही माओवादी शिल्लक नाही, या कारवाईनंतर गडचिरोली पोलीस दलाच्या अभिलेखावरील ०६ पैकी ०५ माओवादी अटकेत आले असून एक महिला माओवादी मोनी मडावी हिने छत्तीसगडमधील बिजापूर येथे आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात अभिलेखावरील एकही माओवादी शिल्लक नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही संपूर्ण कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदिप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक योगेश कुमार आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक, प्राणहिता, गडचिरोली पोलीस व सीआरपीएफ जवानांनी पार पाडली.
#Gadchiroli #GadchiroliPolice #OperationAntimPrahar #AntiNaxalOperation #MaoistOperation #CRPF #BreakingNews #MaharashtraNews #NaxalFreeGadchiroli #PoliceAction #SecurityForces #IndianPolice #AntiMaoist #NationalSecurity #OperationSuccess #GadchiroliUpdates #MaoistArrested #WeaponSeized #BigBreaking #TrendingNews #MaharashtraPolice #C60Commandos #NaxalAttack #WarAgainstNaxalism #IndiaNews #LatestNews #PoliceOperation #InternalSecurity #Naxalism #GlobleGadchiroliNews
——————————————————————-










