उष्माघात कक्षांसह जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज अतिउष्णतेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाचा हायअलर्ट; सर्व रुग्णालयांमध्ये २४ तास विशेष सुविधा उपलब्ध

215

ग्लोबल गडचिरोली न्यूज

गडचिरोली, ता. २३ : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ होत असून प्रशासनाने ‘अतिउष्णतेची लाट’ (Extreme Heat Wave) घोषित केली आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका गंभीर बनण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हा आरोग्य प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यात हायअलर्ट जारी केला असून नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी संयुक्त पत्रकाद्वारे नागरिकांना उन्हाच्या तीव्रतेपासून बचाव करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती दिली. उष्माघाताच्या रुग्णांवर तातडीने उपचार मिळावेत यासाठी जिल्ह्यातील सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये स्वतंत्र ‘उष्माघात कक्ष’ २४ तास सुरू करण्यात आले आहेत.

या विशेष कक्षांमध्ये कूलर, वातानुकूलित सुविधा, विशेष बेड तसेच आपत्कालीन उपचारासाठी आवश्यक औषधसाठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. ओआरएस, आयव्ही फ्लूइड्स आणि इतर आवश्यक औषधांचा पुरेसा साठा ठेवण्यात आला असून सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुर्गम आणि ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचविण्यासाठी आशा स्वयंसेविकांमार्फत जनजागृती मोहीमही राबविण्यात येत आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी सांगितले की, गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यात नागरिकांना तातडीने आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष सुरू करण्यात आले आहेत. उन्हाळ्यात शेतात किंवा इतर कामांसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी शरीरातील पाण्याचे प्रमाण कायम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. चक्कर येणे, मळमळ होणे किंवा अस्वस्थ वाटल्यास घरगुती उपचारांवर वेळ न घालवता तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात उपचार घ्यावेत, असे त्यांनी सांगितले.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी सांगितले की, अतिउष्णतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होऊन उष्माघाताचा धोका निर्माण होतो. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी जिल्ह्यातील सामान्य व ग्रामीण रुग्णालये पूर्णपणे सज्ज असून सर्व वैद्यकीय अधीक्षकांना रुग्णांवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार शरीराचे तापमान अचानक वाढणे, चक्कर येणे, मळमळ होणे, असह्य डोकेदुखी, अत्यधिक तहान लागणे तसेच लघवीचे प्रमाण कमी होणे ही उष्माघाताची प्रमुख लक्षणे आहेत. गंभीर परिस्थितीत श्वास घेण्यास त्रास होणे, हृदयाचे ठोके वाढणे, भ्रम निर्माण होणे किंवा बेशुद्ध पडणे अशी लक्षणे दिसू शकतात.

उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करावा. पुरेसे पाणी, ताक, लिंबूपाणी किंवा नारळपाणी यांचे नियमित सेवन करून शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवावे. हलक्या रंगाचे, सैल व सुती कपडे वापरावेत तसेच दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो उन्हात जाणे टाळावे.

कडक उन्हात शारीरिक कष्टाची कामे करणे, मद्य, चहा, कॉफी किंवा अधिक साखरयुक्त पेये सेवन करणे टाळावे. लहान मुले अथवा पाळीव प्राण्यांना बंद वाहनात एकटे सोडू नये. आरोग्याबाबत कोणतीही तक्रार जाणवल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा, असेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

उष्माघात ही वैद्यकीय आणीबाणी असून कोणालाही अशी लक्षणे आढळल्यास संबंधित व्यक्तीस तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयातील उष्माघात कक्षात दाखल करावे अथवा रुग्णवाहिकेसाठी १०८ किंवा १०२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य प्रशासनाने केले आहे.