जंगलात पुरून ठेवलेले साहित्य पोलिसांकडून नष्ट
गडचिरोली (Gadchiroli), दि. 23 मे 2026 : गडचिरोली जिल्ह्यात माओवादी चळवळीविरोधात सुरू असलेल्या कारवाईला मोठे यश मिळाले असून, आत्मसमर्पित माओवाद्यांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गडचिरोली पोलिसांनी माओवाद्यांचा गुप्त शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त केला आहे. पोमकें-बिनागुंडा जंगल परिसरात जमिनीत पुरून ठेवण्यात आलेले शस्त्रनिर्मिती व स्फोटक साहित्य शोधून ते घटनास्थळीच नष्ट करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, माओवादी संघटनांकडून सुरक्षा दलांवर हल्ले व घातपात घडवून आणण्यासाठी जंगल परिसरात गुप्तपणे शस्त्रे, स्फोटके आणि विविध यांत्रिक साहित्य साठवून ठेवण्यात येत होते. निवडणुका, नक्षल सप्ताह किंवा इतर महत्त्वाच्या कालावधीत या साहित्याचा वापर सुरक्षा दलांवर मोठे हल्ले करण्यासाठी केला जात असल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. दरम्यान, ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’ अंतर्गत दिनांक 16 मे 2026 रोजी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केलेल्या काही माजी माओवाद्यांची सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान त्यांनी पोमकें-बिनागुंडा परिसरातील घनदाट जंगलामध्ये शस्त्रनिर्मितीचे साहित्य व इतर उपकरणे लपवून ठेवल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 21 मे रोजी विशेष अभियान पथक, प्राणहिता युनिट आणि बीडीडीएसच्या जवानांच्या संयुक्त पथकांना शोधमोहीमेसाठी रवाना करण्यात आले.

दिनांक 22 मे रोजी जंगल परिसरात कसून तपासणी सुरू असताना बीडीडीएसच्या जवानांनी संशयित ठिकाणी शोधमोहीम राबवली. यावेळी जमिनीत पुरून ठेवलेले एक लेथ मशीन, बीजीएल पाईप्स, 12 बोअर पाईप, इन्व्हर्टर, जनरेटर, बॅटरी, ग्राइंडिंग मशीन, ड्रिलिंग मशीन, जीग सॉ मशीन, प्रेशर पंप, सोलर पॅनल तसेच 20 फुटांचा फुटबॉल पाईप आदी साहित्य हस्तगत करण्यात आले. माओवादी संघटनेकडून शस्त्रनिर्मितीसाठी या साहित्याचा वापर केला जात असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जप्त करण्यात आलेले सर्व साहित्य घटनास्थळीच नष्ट करण्यात आले. या कारवाईमुळे माओवाद्यांच्या भविष्यातील घातपाती कारवायांना मोठा आळा बसणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी. तसेच पोलीस उप-अधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक, प्राणहिता युनिट आणि बीडीडीएसच्या जवानांनी यशस्वीरित्या पार पाडली. या धाडसी मोहिमेत सहभागी सर्व जवानांचे पोलीस अधीक्षकांनी विशेष कौतुक केले आहे.

#गडचिरोली #Gadchiroli #MaoistOperation #AntiNaxalOperation #OperationAntimPrahar #MaoistFactory #PoliceAction #GadchiroliPolice #BreakingNews #MaoistFreeGadchiroli #SecurityForces #NaxalOperation #MaharashtraPolice #SpecialOperation #PranhitaUnit #BDDS #LatestNews #MarathiNews #CrimeNews #Naxalism #PoliceSuccess #JungleOperation #MaoistHideout #गडचिरोलीपोलीस #माओवादी #नक्षलवाद #ऑपरेशनअंतिमप्रहार #ब्रेकिंगन्यूज #महाराष्ट्रपोलीस #मराठीन्यूज
——————————————————————–










