“सायकल चालवा, पर्यावरण वाचवा”; ३ जूनला गडचिरोलीत भव्य सायकल रॅली जागतिक सायकल दिनानिमित्त सायकलप्रेमींची जनजागृती फेरी; आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश

54

ग्लोबल गडचिरोली न्यूज

गडचिरोली, दि. २ जून : जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल स्नेही मंडळ, गडचिरोली यांच्या वतीने बुधवार, ३ जून २०२६ रोजी शहरात भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यावरण संवर्धन, प्रदूषणमुक्त जीवनशैली आणि आरोग्यदायी जीवनाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

सदर सायकल रॅली सकाळी ६ वाजता इंदिरा चौक, गडचिरोली येथून प्रारंभ होणार असून कारगिल चौक, आयटीआय चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा कार्यालय, आयटीआय चौक, इंदिरा गांधी चौक मार्गे वसंत विद्यालय येथे सकाळी ७.३० वाजता समारोप होणार आहे.

या रॅलीमध्ये शहरातील नागरिक, विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक, कर्मचारी तसेच सायकलप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

“सायकल चालवा, आरोग्यवान व्हा”, “प्रदूषण टाळा, पर्यावरण वाचवा” आणि “इंधन बचतीसाठी सायकल हा सर्वोत्तम पर्याय” हा संदेश समाजापर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. वाढते प्रदूषण, इंधनाच्या किमतींमध्ये होणारी वाढ आणि बदलती जीवनशैली लक्षात घेता सायकलचा वापर वाढविणे ही काळाची गरज असल्याचे आयोजकांनी नमूद केले.

सायकल स्नेही मंडळाचे संस्थापक बंढोपंत बोढेकर, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. विलास पारखी, सरचिटणीस उदय धकाते, उपाध्यक्ष उपेंद्र रोहनकर, महिला उपाध्यक्षा प्रा. सुनीता साळवे, सहसचिव योगिता देशमुख, संघटक प्रा. अरुण पालारपवार तसेच मंडळाचे सदस्य आणि विद्यार्थी प्रतिनिधींनी नागरिकांना या रॅलीत सहभागी होऊन पर्यावरण संरक्षण आणि आरोग्य संवर्धनाच्या चळवळीला बळ देण्याचे आवाहन केले आहे.

जागतिक सायकल दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेली ही रॅली गडचिरोलीकरांमध्ये पर्यावरणपूरक वाहतुकीबाबत जनजागृती घडवून आणण्यास महत्त्वाची ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.