बालविवाह कराल तर खबरदार !!! व्हावे लागेल गजाआड

113

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली,ता. ९ : अक्षय तृतीया हा महत्त्वाचा मुहूर्त असल्याने या मुहुर्तावर सामुदायिक व एकल विवाह समारंभ आयोजित केले जातात. यामध्ये बालविवाहाचे प्रमाण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र बालविवाह हा गुन्हा असून असे विवाह आयोजित करणारे किंवा मदत करणारेही तुरुंगात जाऊ शकतात.

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग नवी दिल्ली यांच्याकडून अक्षय तृतीयाच्या मुहुर्तावर होणारे बालविवाह रोखण्याबाबत केंद्र व राज्य शासनाकडुन निर्देश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार शुक्रवार (ता. १०) बालविवाह आयोजित करणा­ऱ्यांवर प्रशासनाचे विशेष लक्ष राहणार आहे.

शुक्रवारी अक्षय तृतीया आहे. या दिवशी संभावित बालविवाहाच्या घटना थांबविण्यासाठी सर्व यंत्रणांनी बालविवाह प्रतिबंध अधिनियमातील तरतुदीनुसार बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न करावा व याबाबत प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. १८ वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्या पुरुषाने अल्पवयीन वधुशी विवाह केल्यास त्या पुरुषाला दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद आणि १ लाख रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते. जाणीवपुर्वक बालविवाह ठरविल्यास त्यासाठी सोहळा पार पाडल्यास किंवा प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्ती तसेच संबधित वर- वधु यांचे आई-वडील किंवा पालक, अन्य नातेवाईक व मित्रपरिवार, धार्मिक स्थळाचे विश्वस्त, फोटोग्राफर, प्रिंटीग प्रेस, वाजतंत्री, लग्न सभागृहाचे व्यवस्थापक, कॅटरिंग अशा सर्वांनी हा विवाह घडविल्यास प्रत्यक्षात मदत केली किंवा तो न होण्यासाठी प्रयत्न केले नाही, जे अशा विवाहात सामील झाले त्या सर्वांना दोन वर्षांपर्यंत सक्त मजुरीची कैद आणि एक लाख रुपये पर्यंत दंड किवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. बालविवाहाबाबतची माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चॉईल्ड हेल्प लाईन १०९८ गडचिरोली या नंबरवर कळविण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांनी केले आहे.

——————————