ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. १० : बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करताना अनेकदा शेतकऱ्यांना फसवले जात असते. त्यांना चढ्या दरात निकृष्ट उत्पादन देण्याचे प्रकार मागील काही वर्षांत वाढले आहेत. त्यामुळे जिल्हा व तालुका स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
या नियंत्रण कक्षात शेतकऱ्यांच्या अडचणी व निविष्ठांची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी व लिंकिंगबाबत असलेल्या प्रत्येक तक्रारींचे निवारण होईल. नियंत्रण कक्ष १५ मे ते २५ ऑगस्ट या दरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजताच्या वेळेत सुरू राहील. जिल्हास्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात तसेच तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांना तक्रार नोंदविता येईल. तसेच बोगस खते-बियाणे विक्री होत असल्यास नजीकच्या तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी केले आहे. निविष्ठा खरेदी करताना शेतकऱ्यांनी परवाना धारक विक्रेत्याकडूनच बियाणे खरेदी करावे, पक्के बिल घ्यावे, बिलावर दुकानाचे नाव, लॉट नंबर, खरेदी दाराचे नाव, विक्रीची किंमत, अंतिम मुदत असल्याची खात्री करूनच घ्यावी, पावतीवर शेतकऱ्याची सही व अंगठा तसेच विक्रेत्याची सही व शिक्का असावा, कच्चे बिल स्विकारू नये पक्क्या बिलाचा आग्रह धरावा, हंगाम संपेपर्यंत बिल जपुन ठेवावे, पेरणीसाठी पिशवी फोडताना खालील बाजूने फोडावी व पिशवीला असलेले टॅग व लेबल जपून ठेवावा. फेरीवाले, विक्रते (घरपोच सेवा देणारे ) यांच्याकडून बी-बियाणे, खते व कीटकनाशक यांची खरेदी करू नये, कोणत्याही परिस्थितीत छापील किमतीपेक्षा अधिक दराने बियाणे, खते खरेदी करू नये, विक्रेते जबरदस्ती करत असल्यास त्वरित ८६९८३८९७७३ या व्हाट्सअॅप क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक संजय मेश्राम यांनी केले आहे. नियंत्रण कक्षात तक्रारीकरिता ९४०४५३५४८१ या क्रमांकावर व ०७१३२-२२२५९३, ०७१३२-२२२३१२ तसेच टोल फ्री क्र. १८००२३३४०० या क्रमांकावरसुद्धा संपर्क करता येईल. बोगस बियाणे, खते, कीटकनाशके, लिंकिंग, ज्यादा दराने विक्री, पक्की बिलाची पावती न देणे आदींबाबत तक्रार करता येईल.शेतकऱ्यांनी खरीप हंगामात लागवडीसाठी एचटीबीटी (चोर बीटी) बियाणे खरेदी करू नये. जिल्ह्यातील बाजारात सध्या बोगस बियाणे खासगी व्यक्तीमार्फत छुप्या मार्गाने पुरवठा होण्याची शक्यता आहे. या अवैध बियाण्यांना शासनाची कोणतीही कोणतीही मान्यता नाही. अशा प्रकारचे बियाणे विक्री करणे, बाळगणे, साठा करणे गुन्हा आहे. या प्रकारचे लागवड केलेल्या कापूस पिकाची पाने व कापसाचे नमुने तपसणी करण्याचे तंत्रज्ञान अवगत झाले आहे. यात एचटीबीटी आढळून आल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येणार आहे. एचटीबीटी लागवड केल्याने जामिनाचा ऱ्हास होऊन जमिनी कालंतराने नापीक होतात. मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होतो. तरी शेतकऱ्यांनी अधिकृत कापूस बियाणे लागवड करावे. एखाद्या व्यक्तीकडे अनधिकृत एचटी बियाणे आढळून आल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येईल. शक्य तिथे पोलिस विभागाची मदत घेतली जात असल्याचे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक संजय मेश्राम यांनी कळविले आहे.









