ग्लोबल गडचिरोली न्यूज
गडचिरोली, ता. ६ : कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत वादग्रस्त ठरत राहणारे गोंडवाना विद्यापीठ आता तब्बल १.४६ कोटींच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाने पुन्हा चर्चेत आले आहे. विशेष म्हणजे कोट्यवधींच्या रकमेवर डल्ला मारणारे विद्यापीठाचेच चार तृतीय श्रेणी लिपीक आहेत. या एका महिला लिपिकाचाही समावेश आहे. मात्र तिला वगळून इतर तीन लिपिकांना गडचिरोली शहर पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
तृतीय श्रेणी तीन लिपिकांनी सिनेट सदस्य, विविध प्राधिकरणांचे सदस्य तसेच प्राध्यापकांच्या प्रवास भत्त्यांच्या देयकाची रक्कम संबंधितांच्या बँक खात्यात वळती न करता चक्क स्वत:च्या खात्यात वळती केली. विद्यापीठातच राहून हा गोरखधंदा करताना या लिपिकांच्या टोळीने एखाद्या सराईत गुन्हेगारांप्रमाणे तब्बल १.४६ कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे. याप्रकरणी विद्यापीठाकडून प्राप्त तक्रारीवरून गडचिरोली पोलिसांनी चार लिपिकांवर ५ जून रोजी गुन्हे दाखल करून यापैकी तिघांना अटक केली. जिल्हा न्यायालयाने या आरोपींना १० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, विद्यापीठाने यासंबंधी चौकशी केली असता १.४६ कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आढळून आले. महेंद्रकुमार उसेंडी (वय ३७), अमित जांभुळे (वय ३८), अमोल रंगारी (वय ३६) व प्रिया पगाडे अशी या चार आरोपी लिपिकांची नावे आहेत. त्यांच्यावर गडचिरोली पोलिसांनी भादंविचे कलम ४२०, ४०९ आणि १२० ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यापैकी महिला लिपिक प्रिया पगाडे वगळता इतर तीन लिपिकांना अटक करण्यात आली असून ते पोलिस कोठडीत आहेत, अशी माहिती गडचिरोलीचे पोलिस निरीक्षक अरुण फेगडे यांनी दिली. विशेष म्हणजे कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी महेशकुमार उसेंडी याची स्वत:च्या नावाची सहा खाती आहेत. तर इतर तीन लिपिकांची प्रत्येकी एक अशा तीन खात्ंयात रक्कम वळती करण्यात आली. प्रवास भत्त्याच्या देयकाची रक्कम एकूण ९ खात्यांत वळती करण्यात आली.
आचार्य चाणक्य म्हणतात तेच खरे…
आचार्य चाणक्य (कौटील्य) यांनी आपल्या ग्रंथात लिहिले होते की, ज्या प्रमाणे पाण्यात राहणारा मासा पाणी कधी पितो हे कळत नाही, तसेच सरकारी व्यवस्थेत असलेली व्यक्ती पैसे कधी खाते ते कळत नाही. अगदी हेच वाक्य सार्थ करत गोंडवाना विद्यापीठातच कार्य करणारे हे लिपिक अतिशय शिताफीने रक्कम आपल्या खात्यात वळवत होते. पण अखेर त्यांचे बिंग फुटले असून त्यांना तुरंगाची वारी घडली आहे.









