९१२ पोलिस शिपाई पदासाठी २४५७० उमेदवारांचे अर्ज

107

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १७ : गडचिरोली जिल्हा पोलिस भरती- २०२२-२३ (प्रत्यक्ष भरती -२०२४) ची मैदानी चाचणी जाहीर करण्यात आली असून १९ जून २०२४ पासून पोलिस शिपाई चालक, २१ जून २०२४ पासून पोलिस शिपाई पदभरतीस प्रारंभ होणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी आज पत्रकार परीषदेत दिली.

पोलिस अधीक्षक नीलोत्पल म्हणाले की, पोलिस शिपाई चालक पदाच्या १० जागांसाठी तसेच गडचिरोली पोलिस शिपाई पदाच्या ९१२ जागांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या दोन्ही भरतीकरिता मैदानी (शारीरिक) चाचणीची तारीख जाहीर झाली असून ती १९ जून ते १२ जुलै २०२४ या कालावधीत गडचिरोली पोलिस मुख्यालयातील पटांगणावर आयोजित करण्यात आली आहे. गडचिरोली पोलिस शिपाई चालकाच्या १० पदांकरिता २२५८ उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले असून त्यापैकी १९६७ पुरुष उमेदवार व २९१ महिला उमेदवार आहेत. तसेच पोलिस शिपाईच्या ९१२ पदाकरिता एकूण २४५७० उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. त्यापैकी १६८०३ पुरुष व ७७६७ महिला उमेदवारांचे अर्ज आहेत. पोलिस शिपाई चालक पदाच्या एकूण १० जागांपैकी अनुसूचित जाति- १, अनुसूचित जमाती-२, भज(ब)-१, भज(क)- १, इमाव-२, एसईबीसी-१, इडब्ल्युएस-१, अराखीव-१ अशा स्वरुपात पदभरती घेण्यात येणारआहे. यासोबतच पोलिस शिपाई पदाच्या एकूण ९१२ जागांपैकी अनुसूचित जाती- १२१, अनुसुचित जमाती-२१०, विज(अ)-५४, भज (ब)-५०, भज (क)- ५७, भज (ड)-४६, विमाप्र-४६, इमाव-१५८, एसईबीसी-५०, इडब्ल्युएस-५०, अराखीव-७० अशा स्वरुपात पदभरती घेण्यात येणार आहे. पोलिस शिपाई चालक पदाकरिता दर दिवशी सरासरी १००० उमेदवारांची व पोलिस शिपाई पदाकरिता दर दिवशी सरासरी १३०० उमेदवारांची शारीरिक (मैदानी) चाचणी घेण्यात येणार आहे. सर्व उमेदवारांना पोलिस शिपाई व चालक पोलिस शिपाई पदाच्या मैदानी (शारिरीक) चाचणी परीक्षेचे प्रवेशपत्र महाआयटी विभागामार्फत ऑनलाइन पद्धतीने डाऊनलोड करण्यास उपलब्ध करून देण्यात आले आहे. सर्व उमेदवारांनी आपले मैदानी (शारिरीक) चाचणी परीक्षेचे प्रवेशपत्र https://policerecruitment2024.mahait.org या वेबसाईटवरून डाऊनलोड करून घ्यावे तसेच प्रवेशपत्रावर नमूद असलेल्या मैदानी (शारीरिक) चाचणी परिक्षेची तारीख लक्षात घेऊन मैदानी (शारिरीक) चाचणीकरिता आवश्यक कागदपत्रांसह पोलिस मुख्यालय गडचिरोली येथे हजर राहण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले. ही पदभरती प्रक्रिया अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबवण्यात येणार असून यामध्ये उमेदवारांची छाती-उंची या शारीरीक मोजणीकरीता पीएसटी (PST) Digital Physical Standard Test तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. तसेच उमेदवारांची १६०० मीटर धावणे (पुरुष), ८०० मीटर धावणे (महिला), १०० मीटर धावणे (पुरुष व महिला) च्या चाचणीकरिता (RFID) Based Technology चा वापर करण्यात येणार आहे. यासोबतच गोळा फेक चाचणीकरीता Prism Technology चा वापर करण्यात येणार आहे. मैदानी (शारीरिक) चाचणीमध्ये उत्तीर्ण होऊन लेखी परीक्षेकरिता पात्र उमेदवारांची बायोमॅट्रीक पद्धतीने हजेरी घेऊन पडताळणी करण्यात येणार आहे. जर पावसामुळे एखाद्या दिवशी मैदानी चाचणी होऊ शकली नाही, तर त्यांना पुढची सुयोग्य तारीख दिली जाईल. सोबतच काही उमेदवारांना वेगवेगळ्या पदाकरिता एकापेक्षा जास्त ठिकाणी आणि एकाच दिवशी मैदानी चाचणीकरिता हजर राहण्याची सूचना प्राप्त झाल्यास अशा उमेदवारांना दुसरी तारीख दिली जाईल. उमेदवारांना इतर काही अडचणी आल्यास त्याचे निरसन स्थानिक पातळीवर करण्यात येईल. या पदभरती प्रक्रियेमध्ये गैरप्रकार करताना आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी तत्काळ रद्द करून त्याच्यावर प्रचलित कायद्यान्वये योग्य ती कायदेशीर कारयवाई करण्यात येईल. उमेदवारांनी कुठल्याही प्रलोभन किंवा आमिषाला बळी पडू नये. कोणी आमिष किंवा प्रलोभन देत असेल तर पोलिस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथील समाधान कक्ष, दूरध्वनी क्र ८८०६३१२१०० यावर तसेच उपविभागीय कार्यालय, पोलिस स्टेशन, उप पोलिस स्टेशन, पोलिस मदत केंद्र येथे माहिती द्यावी, असेही पोलिस अधीक्षक नीलोत्पल पत्रकार परीषदेत म्हणाले.या पत्रकार परीषदेला अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता उपस्थित होते.