Home मराठी गडचिरोलीतील सामान्य माणूस आता समृद्धीकडे जाताना दिसेल : देवेंद्र फडणवीस

गडचिरोलीतील सामान्य माणूस आता समृद्धीकडे जाताना दिसेल : देवेंद्र फडणवीस

189

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १७ : येथील निर्माणाधीन सुरजागड पोलाद प्रकल्पातून आठ दशलक्ष टन तर लॉईड्स प्रकल्पातून चार दशलक्ष टन पोलाद उत्पादन होणार आहे. हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर महाराष्ट्रात ३० टक्के पोलाद उत्पादन एकट्या गडचिरोलीतून होणार आहे. त्यामुळे येथे उद्योग व रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार असून माओवादामुळे मागे राहिलेला येथील सामान्य माणूस समृद्धीकडे जात असल्याचे चित्र आपणास दिसेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सुरजागड इस्पात स्टील प्रकल्पाचे बुधवार (ता.१७) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अहेरी तालुक्यातील वडाळापेठ येथे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. धर्मरावबाबा आत्राम, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय दैने, जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल, लॉईड्स मेटलचे प्रमुख बी. प्रभाकरन, सुरजागड इस्पात कंपनीचे प्रमुख सुनील जोशी प्रामुख्याने उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्यात सुरू होणार्‍या उद्योगात ८० टक्के रोजगार स्थानिकांना उपलब्ध करून देण्याच्या अटी घालण्यात आल्या आहेत. त्याचा स्थानिक नागरिकांना फायदा होणार आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, हे स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, गडचिरोली जिल्ह्यातील जल, जमीन, जंगल हे वैभव टिकवूनच येथे उद्योगधंदे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासोबतच आदिवासींचे दैवत असलेले ठाकूर देवाजवळ कोणत्याही प्रकारचे उत्खनन होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. चामोर्शीतसुद्धा ३५ हजार कोटींची गुंतवणूक होत असून त्यातून २० हजार लोकांना रोजगार मिळणार आहे, अशीही माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तत्पूर्वी राज्यातील जनसामान्यांचा विकास होण्याकरिता आषाढी एकादशीनिमित्त पांडुरंगाला साकडे घालत असल्याचे ते म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्यातील हजारो कोटींची खनिज संपत्ती येथील आदिवासी समाजाला आर्थिक सुबत्ता देऊन जाईल. त्यानिमित्त जिल्ह्यात येणार्‍या हजारो कोटी गुंतवणुकीचा येथील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले की, दावोस कराराच्या अंमलबजावणीचे उदाहरण म्हणजे आजचा भूमिपूजन होय. मंत्री डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रात शिक्षण, सिंचन आणि रोजगार निर्मितीचे लक्ष पूर्ण करून क्रांती घडवून आणायची असल्याचे सांगितले. हा प्रकल्प १० हजार कोटी रुपयांचा असून यातून ७ हजार पेक्षा अधिक स्थानिकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. संपूर्ण प्रकल्प २०३०पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कंपनीत नियुक्त १६ सुरक्षारक्षकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. याशिवाय स्टील प्लांटतर्फे रुग्णवाहिका व विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके वितरित करण्यात आले.