- ग्लोबल गडचिरोली न्यूज,
- गडचिरोली, ता. १९ : पावसाच्या पाण्याने फुगलेला खळाळून वाहणारा नाला, एक जेसीबी आणि प्रसवकळा सोसणारी गरोदर माता हे चित्र कदाचित तुमच्या डोळ्यांपुढे कधी आलं नसेल. पण गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भामरागड तालुक्यातील गोरगरीब नागरिकांच्या नशिबी असेही जीवघेणे प्रसंग येतात. येथे प्रसवकळा सोसत असलेल्या महिलेला रुग्णालयात जाताना समोरून खळाळता नाला पार करण्यासाठी जेसीबीचा आधार घ्यावा लागला. तिला जेसीबीच्या पुढच्या फावड्यात (बकेट) बसून धोकादायक पद्धतीने हा नाला पार करावा लागला. यातून लोकप्रतिनिधी जिल्हा विकासाचे करत असलेले दावे किती फोल आहेत, हेही उघडकीस आले आहे.

- जेवरी संदीप मडावी (वय २२)रा. कुडकेली ता.भामरागड असे या गरोदर महिलेचे नाव आहे. आलापल्ली ते भामरागड या १३०-डी क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर ऐन पावसाळ्याच्या तोंडावर विविध ठिकाणी पुलांचे बांधकाम सुरू करण्यात आले. मात्र, रहदारीसाठी पर्यायी मार्ग व्यवस्थित आणि मजबूत न केल्याने मागील दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे पर्यायी मार्ग वाहून गेला. त्यामुळे दोन दिवसापासून आलापल्ली ते भामरागड या राष्ट्रीय महामाग्गावर रहदारी पूर्णपणे बंद झाली आहे. याचा फटका या गरोदर मातेला बसला आहे. गुरुवार १८ जुलै रोजी मध्यरात्री झालेल्या पावसामुळे नाल्यांना पूर आल्याने शुक्रवार १९ जुलै रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास आलापल्ली- भामरागड महामार्गावर जेवरी मडावीला नाला पार करायला जेसीबीचा आधार घ्यावा लागला. २७ जुलै रोजी तिची प्रसूतीची तारीख होती. मात्र, १९ जुलैलाच सकाळी तिला प्रसववेदना सुरू झाल्या. त्यामुळे सुमदाय आरोग्य अधिकारी व परिचारिका तिला रुग्णवाहिकेतून भामरागड ग्रामीण रुग्णालयात घेऊन जात होत्या. मात्र वाटेत मोठा नाला लागला. गुरुवारीच मुसळधार पाऊस कोसळल्याने या नाल्यातून पाणी वाहत होते. त्यामुळे रहदारी अशक्य होती. रुग्णवाहिका पुढे नेता येत नसल्याने शेवटी जेसीबीच्या बकेटमध्ये महिला व तिच्या पतीला बसवून पैलतिरावर सोडण्यात आले. आलापल्ली- भामरागड राष्ट्रीय महामार्गाचे (क्र.१३० डी) सध्या बांधकाम सुरू आहे. या नाल्यावर बांधकामासाठी जेसीबी होता. त्यात बसून हा नाला ओलांडल्यानंतर जेवरी मडावीला दुसऱ्या रुग्णवाहिकेतून भामरागड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावरून गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाचा गाडा अद्यापही अशाच अव्यवस्थेच्या चिखलात रूतून बसल्याचे दिसून येत आहे.









