सिरोंचातील वसतिगृहाच्या ७५ विद्यार्थ्यांचे रेस्क्यू ऑपरेशन

240

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १९ : सिरोंचा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने येथील सुभाषचंद्र बोस वसतिगृहात अडकून पडलेल्या ७५ विद्यार्थ्यांचे रेस्क्यू आॅपरेशन यशस्वीपणे १८ जुलै रोजी रात्री ११ वाजता राबविण्यात आले.

१८ जुलै रोजी रात्री ११ वाजता दरम्यान सिरोंचा सुभाषचंद्र बोस वसतिगृहात पावसाचे पाणी घुसले. सर्वत्र पाणीच पाणी असताना पाण्यासोबत अनेक सापही आले. त्यामुळे या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना बाहेर काढणे अत्यंत गरजेचे आहे, अशी माहिती सिरोंचाचे उपविभागीय पोलिस अधिकारी संदेश नाईक यांना मिळाली. त्यांनी लगेच सिरोंचा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक समाधान चव्हाण व त्यांचे सहकारी राकेश नागुला, प्रवीण तोर्रेम, दिलीप ऊईके, राकेश करमे व नईम शेख यांना वसतिगृहात पाठवले. या वसतिगृहाच्या चारही बाजुने पाणीच पाणी भरले होते. तेथे जाताही येत नव्हते. परंतु वसतिगृहातील विद्यार्थ्यांना तिथून बाहेर काढणे अत्यंत आवश्यक असल्याने पोलिस कर्मचारी राकेश नागुला, प्रवीण तोर्रेम, राकेश करमे, नईम शेख यांनी आपल्या जिचाची पर्वा न करता मुसळधार पावासता, काळ्याकुट्ट अंधारात बॅटरीच्या जेमतेम उजेडात पाण्यातून वाट काढत सुभाषचंद्र बोस वसतिगृह गाठले. त्यानंतर येथे अडकलेल्या ७५ विद्यार्थ्यांना धीर देऊन त्यांना तेथून सुरक्षीतरित्या रेस्क्यू करून दुसऱ्या सुरक्षीत ठिकाणी आणले. पाण्याची पातळी अधिक असल्याने काही मुलांना पोलिसांनी आपल्या खांद्यावर बसवून आणले. त्यांच्या या बचाव अभियानाचे व निरागस चिमुकल्यांना वाचविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे. हे बचाव अभियान पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनात, उपविभागीय पोलिस अधिकारी संदेश नाईक यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक समाधान चव्हाण, पोलिस अंमलदार राकेश नागुला, प्रवीण तोर्रेम, दिलीप ऊईके, राकेश करमे, नईक शेख यांनी यशस्वी केले.