पाऊस थांबता, थांबे ना…अद्याप ३३ मार्ग बंद

168

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. २२ : मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच असून अद्याप अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळतच आहेत. या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल ३३ मार्ग बंद झाले आहेत.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी अद्याप पावसाच्या सरी कोसळत असल्या, तरी पावसाचा जोर काहिसा कमी झाला आहे. त्यामुळे परीस्थिती पूर्वपदावर यायला सुरूवात झाली आहे. भामरागडनजीकच्या पर्लकोटा नदीचा पूर ओसरला असून तेथील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. गोसेखुर्द धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग वाढवून तो ३ लाख ५४ हजार क्यूसेक्स करण्यात आला आहे.. चार दिवस पडलेला मुसळधार पाऊस आणि धरणातील पाण्यामुळे नदी, नाल्यांना पूर आला असून गडचिरोली-आरमोरी, आलापल्ली- ताडगाव, भामरागड- एटापल्ली, आलापल्ली-सिरोंचा, आष्टी-आलापल्ली या प्रमुख मार्गांसह ३३ मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. विशेष म्हणजे अनेक वर्षांनंतर गडचिरोली-मूल आणि मूल-चंद्रपूर मार्ग बंद झाला. यावरूनच पावसाचे रौद्ररूप लक्षात येते. त्यामुळे जिल्ह्याती शेकडो गावांचा संपर्क अद्याप तुटलेलाच आहे. मागील २४ तासांत कुरखेडा तालुक्यात सर्वाधिक १४४ मिलिमीटर पाऊस कोसळला. त्याखालोखाल देसाईगंज तालुक्यात ११७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गडचिरोली तालुक्यातील कोटगल बॅरेजच्या कामावरील ७० कामगारांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे, तर पारडी येथील १९ जणांना गावातच स्थलांतरीत करण्यात आले आहे. रविवार २१ जुलै रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास भर पावसात मुलचेरा-आलापल्ली मार्गावरून मोटारसायकलने प्रवास करताना नवीनकुमार रेड्डी या व्यक्तीचा झाडाला धडक दिल्याने मृत्यू झाला. अतिवृष्टीमुळे १२ घरांचे अंशतः नुकसान झाले, तर एक गोठा पूर्णतः क्षतिग्रस्त झाला आहे. काही ठिकाणी पुराचे पाणी ओसरत असले, तरी गोसेखुर्द धरणातून विसर्ग सुरूच असल्याने तसेच गडचिरोलीसह नजिकच्या चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात पुढील चार दिवस पावसाचा येलोव्ह अलर्ट दिल्यामुळे पूरपरीस्थिती वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही. दरम्यान पावसाची रिपरिप सुरूच असून जिल्ह्यातील ३३ मार्गांवरील वाहतूक अजूनही ठप्पच आहे. शिवाय अनेक गावांचा संपर्कही तुटला आहे. ही सगळी पूरपरीस्थिती बघता जिल्हाधिकारी संजय दैने यांनी सरकारकडून प्राप्त अधिकारांचा वापर करत मंगळवार २३ जुलै रोजी जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे.

——————-