ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. २७ : तिची प्रसूतीची तारीख आजच म्हणजे २७ जुलैला होती. पण तिचा गाव सिरोंचा तालुक्यातला छत्तीसगड राज्याच्या सीमेवरचा. या गावाच्या एका बाजुला नदी, दुसरीकडे घनदाट जंगल, तर उरलेल्या दोन बाजुंना ओसंडून वाहणारे मोठे नाले. ती गर्भवती माता अशी संकटात सापडली असताना देवदुतासारखे बचाव पथक तिच्या मदतीला आले. भरभरून वाहत असलेल्या कर्जेली नाल्यातून कौशल्याने बोट हाकत तिला बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोनी संतोष आत्राम (वय २६) रा. कर्जेली, ता. सिरोंचा, असे या गर्भवती महिलेचे नाव आहे.
सोनी आत्राम या गर्भवती मातेला आरोग्य विभागाने दिलेली प्रसुतीची तारीख २७ जुलै होती. मात्र, कर्जेली गावाला पुराचा वेढा असल्याने पूरपरिस्थितीत तिच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून गावातील आशा वर्कर आणि आरोग्य सेविकेने वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. या गरोदर मातेला गावातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होते. मात्र, गाव नदी-नाल्यांनी वेढलेला असल्यामुळे प्रशासनापुढे मोठेच आव्हान उभे होते. मग तत्काळ एसडीआरएफ चमुला पाचारण करण्यात आले. या बचाव पथकाने ओसंडून वाहत असलेल्या कर्जेली नाल्यातून कौशल्याने बोट बाहेर काढत या गर्भवती मातेला रुग्णालयात दाखल केले. विशेष म्हणजे कर्जेली हे गाव सिरोंचा तालुका मुख्यालयापासून तब्बल ६४ किलोमीटर अंतरावर असून झिंगानुर प्राथमिक आरोग्य केंद्रात समाविष्ट आहे. सिरोंचा तालुक्यातील आणि छत्तीसगड सीमेवर वसलेला हा गाव घनदाट जंगलांने व्यापला आहे. सध्या मुसळधार पावसामुळे येथील नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. दरवर्षी पावसाळ्यात या गावाचा संपर्क तुटत असतो. गावाचा पूर्व दिशेला इंद्रावती नदी, दक्षिण आणि उत्तरेस दोन्ही बाजूला मोठा नाला वाहतो, तर पश्चिमेस घनदाट जंगल आहे. अनेक वर्षांपासून येथे पुलाची मागणी होत असूनही अद्याप पूल बांधण्यात आला नाही. त्यामुळे या गर्भवती महिलेला असा जीवघेणा प्रवास करावा लागला. येथे लवकरात लवकर पूल बांधावा, अशी मागणी होत आहे.