खाटेची कावड करून त्यात जखमी बापाला ठेवून मुलाचा भर पावसात १८ किमीचा प्रवास

133

ग्लोबल गडचिरोली न्यूज

गडचिरोली,ता. २७ : शेतात काम करताना पाय घसरून पडलेल्या आपल्या पित्याला उपचार मिळावे म्हणून भामरागड तालुक्यातील भटपारच्या एका मुलाने खाटेची कावड करून ती खांद्यावर धरून तब्बल १८ किमीचा जीवघेणा व भर पावसातील प्रवास पायी केला.

भामरागड तालुक्यातील भटपार येथील मालू केये मज्जी (वय ६७ ) हे शेतकरी शुक्रवार (ता. २६) शेतीकाम करताना चिखलात घसरून पडल्याने जखमी झाले होते, त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी कोणतीच सोय नव्हती. तेव्हा त्यांचा मुलगा पुसू मज्जी याने त्याच्या मित्रांच्या मदतीने खाटेची कावड करून भर पावसात चिखल तुडवत तब्बल १८ किलोमीटरचा पायी प्रवास केला व भटपार येथून भामरागडच्या रुग्णालयात घेऊन गेला. वाटेत दुथडी भरून वाहणारी नदी लागली तेव्हा पित्याला वेळेवर उपचार मिळावे म्हणून या मुलाने धोकादायक डोंग्याच्या साह्याने ही नदी पार करून आपल्या पित्याला रुग्णालयात भरती केले होते. मात्र त्यांच्या पायाच्या फ्रॅक्चरवर पुरेसे उपचार होऊ शकले नाही. त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्याची गरज असून त्यासाठी गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिला. सध्या भामरागड तालुक्याचा जगाशी संपर्क तुटला असल्याने मालू मज्जी व त्यांचा मुलगा पुसू मज्जी यांना तसाच जीवघेणा प्रवास करत परत यावे लागले. मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असल्याने रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे रस्ते विरहित भागांतील लोकांना वैद्यकीय उपचारांसाठी पायपीट करत रुग्णालय गाठावे लागत आहे. गर्भवती महिलांनाही प्रसुती काळात रस्त्याअभावी रुग्णवाहिका उपलब्द होत नाही. त्यामुळे रुग्णालयात दाखल होण्यासाठी हाल सोसावे लागत आहेत. आठवडाभरपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका भामरागड तालुक्याला बसला आहे. पर्लकोटा नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने भामरागड व इतर गावांचा जगाशी संपर्क तुटला आहे. देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना गडचिरोली जिल्ह्यात आजही खाटेची कावड करण्याचा प्रसंग येथील नागरिकांवर येत आहे. तरीही सरकार गडचिरोली जिल्ह्याचा विकास झाल्याचे कसे सांगते, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.