अहो आश्चर्य !!! दारुविक्रेत्याच्या घरात मिळाले २१ लाख रुपये

470

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ४ : गडचिरोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नवेगाव येथील स्वप्नील उर्फ शुभम शेंडे या अवैध दारूविक्रेत्याच्या घरात दारू लपवून ठेवल्याची माहिती मिळताच पोलिसांना त्याच्या घरावर छापा टाकला असता हजारो रुपयांची देशी दारू तसेच सुमारे २१ लाख ८० हजार २४० रुपयांची रोकड आढळून आली. त्यामुळे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिसांनी संपूर्ण रक्कम व दारू असा एकूण २१ लाख ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. मात्र दारूविक्रेता स्वप्नील शेंडे फरार झाला.

स्वप्नील शेंडे याच्या घरात दारूसाठा असल्याची माहिती मिळताच पोलिसांचे पथक त्याच्या घरी पोहोचले. मात्र घराच्या दरवाजाला कुलूप होते. दरम्यान, घरासमोर बसलेल्या यशोदा शेंडे नामक महिलेची चौकशी केली असता तिने घर आपल्या मालकीचे असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी पंचांसमक्ष दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तपासादरम्यान पोलिसांना २१ लाख ८० हजार २४० रुपयांची रोख रक्कम सापडली. या रकमेत ५००,२००, १००, ५० आणि २० रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. दारूविक्रेत्याच्या घरात एवढी मोठी रक्कम आली कुठून? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत. स्वप्नील शेंडे याच्या घरावर केलेल्या कारवाईदरम्यान स्वप्नील घराबाहेर होता. घरातून २१ लाख ८० हजार रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केल्याची माहिती मिळताच स्वप्नील फरार झाला. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील दारूविक्रेत्याच्या घरातून एवढी मोठी रक्कम जप्त केल्याची ही पहिलीच कारवाई आहे. ही कारवाई ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक दीपक चव्हाण, महिला पोलिस उपनिरीक्षक आरती सासवडे, पोलिस हवालदार पोल्लेलवार, स्वप्नील कुडावले, महिला पोलिस कर्मचारी वाचामी, बडे, मेश्राम, भुसारी आदींनी केली.