धर्मरावबाबा कसलेले वस्ताद शेवटचा डाव टाकणे बाकी::उपमुख्यमंत्री अजित दादा पवार
ग्लोबल गडचिरोली न्यूज,
अहेरी:
माझ्या नावाचा वापर करून आपल्या घरी येणाऱ्यांना बाहेर घालवा. माझं घर फोडनाऱ्याला थारा देऊ नका .लहानपणापासून जिला वाढविले तीच मुलगी आता माझ्या विरोधात उभी राहणार असून ,जी माझी झाली नाही ती तुमची सुद्धा होणार नाही.त्यामुळे माझी मुलगी भाग्यश्री व जावई ऋतुराज हलगेकर यांना प्राणहिता नदीत बुडवा त्यांच्यावर विश्वास करु नका असे वादग्रस्त विधान राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले.
आलापल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट) तर्फ़े आयोजित जनसन्मान यात्रेला संबोधित करतांना त्यांनी उद्विगपणे हे उद्गार काढले. राष्ट्रवादी काँग्रेस(श.प) तर्फे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम हिला येत्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याची शक्यता असल्याने वडील- व मुली मध्ये फूट टाकून लढविण्याची योजना आहे.मात्र,एक मुलगी दूर गेली तरी माझा भाऊ रवींद्र, मुलगी तनुश्री, मुलगा हर्षवर्धन, चुलता रामेश्वर बाबा असा मोठा आप्तपरिवार माझ्या सोबत असल्याने काही बिघडत नाही. ज्यांनी जीवनभर दुसऱ्याचे पक्ष फोडले असे शरद पवार आता माझे घर फोडण्यासाठी कारस्थान करीत आहे असे धर्मरावबाबा म्हणाले.
जनसन्मान यात्रेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आगमन होताच नागेपल्ली येथे त्यांनी महिलांकडून पर्यावरण पूरक राखी बांधली .लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेत काय?याची सुद्धा चौकशी केली.
यावेळी जनतेला संबोधित करतांना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले,
धर्मरावबाबा आत्राम हे कसलेले पैलवान वस्ताद असून ,त्यांनी आपला शेवटचा डाव राखून ठेवला आहे.त्यामुळे बंडखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाग्यश्री ताईंनी परत आपल्या घरी यावे असे आवाहन केली.महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून अनेक जनकल्याणकारी योजना राबविण्यात येत आहे.गरीब परिवाराला मोफत गॅस सिलेंडर,गरीब मुलींना मोफत कॉलेज चे शिक्षण,लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण आदी.अनेक योजना आनल्या आहेत.लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी आता मुदत 30 सप्टेंबर पर्यत वाढविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्ह्यात मेडिकल कॉलेज
साठी 1000 कोटी मंजूर करण्यात आले आहे.रस्ते व इतर पायाभूत सुविधेसाठी मोठा निधी दिला आहे.रोजगार दिल्याशिवाय सुबत्ता येणार नाही कोनसरी येथील 20 हजार कोटींच्या गुंतवणूकीतून स्थानिकांना रोजगार मिळणार आहे.आदिवासी भागाचा विकास व्हावा म्हणून अर्थसंकल्पात आदिवासी विकास योजनेसाठी 15360 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.विकासाच्या मुख्य प्रवाहात आल्याशिवाय आदिवासींचा विकास शक्य नाही असे प्रतिपादन त्यांनी केले.
लोकसभेत विरोधकांनी संविधान बदलले जाणार असा खोटा अपप्रचार महायुती विरोधात केला त्याचा फटका बसला मात्र ,संविधान बदलले जाऊ शकत नाही.येत्या विधानसभेत विरोधकांचा चांगलाच समाचार घेणार असे पवार म्हणाले.
यावेळी शिवसेना (उबाठा)गटाचे जिल्हाप्रमुख रियाज शेख व अहेरी नप येथील 4 नगरसेवकांनी अजित पवार यांच्या हस्ते दुपट्टा टाकून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र वासेकर तर संचालन पूर्वा दोंतुलवार यांनी केले.









