ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. ९: चोरीच्या प्रकरणात गडचिरोली पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून यात एका विधिसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे.
प्राप्त माहितीनुसार गुरुवार (ता. ५) प्रियंका विवेक मेश्राम त्यांच्या पतीसोबत कार क्र. एम एच ०२ बी वाय ३५६५ ने घरघुती सामान ठेवलेली बॅग व छोट्या पर्समध्ये चार नग सोन्याची अंगठी ठेवलेली एक बॅग अशा दोन बॅग गाडीच्या सीटमागे ठेवून ब्रह्मपूरी मार्गे देसाईगंज येथे येत असताना मौजा चिचोली येथील अण्णा बार समोर मयंक रवींद्र सेंदरे (वय २४) व त्याचा साथीदार विधिसंघर्षित बालक ( वय १६) दोघेही रा. आंबेडकर वाॅर्ड, देसाईगंज या दोघांनी रस्त्यावर त्यांची गाडी थांबवून मदत मागितली असता दोघेही ओळखीचे व आंबेडकर वाॅर्ड येथील असल्याने त्यांना गाडीत बसवून आंबेडकर वाॅर्ड घेऊन गेले. ते दोघेही गाडीतून उतरून आपल्या घरी गेले. त्यानंतर फिर्यादी प्रियंका मेश्रमा यांनी घरात जाऊन बॅग उघडुन पाहिली असता बॅगमध्ये छोट्या पर्समध्ये असलेल्या चार नग सोन्याच्या अंगठ्या दिसून आल्या नाहीत. हा मुद्देमाल कोणीतरी चोरून नेल्याची तक्रार त्यांनी देसाईगंज पोलिस स्टेशन येथे दिली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. प्रभारी अधिकारी अजय जगताप यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक संदीप आगरकर व त्यांच्या पोलिस स्टाफने यातील संशयित आरोपीतांचा शोध घेतला असता, मिळालेल्या खात्रीशिर गोपनिय माहितीच्या आधारे संशयित आरोपी मयंक सेंदरे याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार विधिसंघर्षित बालक याच्यासोबत मिळून संगनमताने चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून अटक करण्यात आली व त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्यात चोरीस गेलेला माल एकूण ४ नग सोन्याच्या अंगठ्या, वजन अंदाजे २४ ग्रॅम, किंमत ७२ हजार असा संपूर्ण मुद्देमाल आरोपीकडून हस्तगत करण्यात आला. तसेच विधिसंघर्षित बालकाच्या पालकांना सूचनापत्र देऊन बाल न्यायमंडळापुढे हजर करण्याबाबतची तजवीज ठेवली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संदीप आगरकर करीत आहेत.
————————————–










