ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. १५ : चामोर्शी तालुक्यातील नरेंद्रपुर येथील दारूविक्रेत्यांना धडा शिकवण्यासाठी मुक्तिपथ गाव संघटन, ग्रामपंचायत समितीने मोहीम हाती घेतली आहे. नुकतेच घोट पोलिस, वनविभाग व मुक्तिपथच्या सहकार्याने जंगल परीसरातील तीन दारूभट्ट्या, दहा बोरी व दोन ड्रम सडवा असा एकूण १ लाख ४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नरेंद्रपुर येथे अवैध दारूविक्री केली जाते. या गावात सात विक्रेते सक्रिय असून इतर गावांतील किरकोळ विक्रेत्यांना दारूचा पुरवठा केला जात होता. गावात दारूबंदी लागू करण्यासाठी मुक्तिपथ गाव संघटनेकडून विविध उपक्रम राबविले जात आहे. सोबतच अहिंसक कृतीच्या माध्यमातून विक्रेत्यांचा मुद्देमालदेखील नष्ट करण्यात आला आहे. गावातील काही विक्रेत्यांनी जंगल परीसरात हातभट्टी लावून दारू गाळत असल्याची माहिती प्राप्त झाली. त्या आधारे घोट पोलिस, वनविभाग, गाव संघटन, ग्रामपंचायत समिती व मुक्तिपथ टीमने संयुक्तरीत्या शोधमोहीम राबवली असता तीन हातभट्ट्या आढळून आल्या. घटनास्थळावर १० बोरे व २ ड्रम मोहफुलाच्या सडव्यासह १ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी तीन दारूविक्रेत्यांवर घोट पोलिस मदत केंद्रात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच या कारवाईच्या धास्तीमुळे गावातील ठोक व किरकोळ दारूविक्रेत्यांनी गाव सोडून पळ काढला आहे. ही कारवाई पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी गोहणे यांच्या मार्गदर्शनात बीट अंमलदार दुलाल मंडल, पोलिस कर्मचारी साईकृपा मुरकुटे यांनी केली. यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष महेश बिस्वास, ग्रामपंचायत सदस्य सरोज तरफदार, वनविभागाचे जिल्ले, शंकर गेडाम, दिलीप यगंटीवार, संतोष राऊत, युवा सदस्य किशोर कुंडू, लक्ष्मीकांत मंडल, बिरेन तरफदार, कमल विश्वास, विश्वजित विश्वास, मुक्तिपथचे आनंद इंगळे, आनंद सिडाम ,विनोद पांडे यांचा सक्रिय सहभाग होता.









