नवरात्रोत्सवाने निर्माण झाले भक्तीमय वातावरण

135

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ३ : नवदुर्गा आदीशक्तीच्या नवरात्रोत्सवाला गुरुवार ३ आॅक्टोबर घटस्थापनेपासून प्रारंभ झाला असून सर्वत्र आनंद, उत्साह आणि भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.

जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील नवरात्रोत्सव राज्यभरात प्रसिद्ध आहे. यंदा आरमोरी शहरातील टिळक चौकात सार्वजनिक दुर्गामाता देवस्थानाने छत्तीसगड राज्यातील महासमुंद जिल्ह्यातील खल्लारी माता मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी भाविकांचा जनसागर उसळणार आहे. येथील टिळक चौकातील दुर्गा मंदिर हे रामसागर तलावाच्या काठावर वसलेले असून ते जागृत देवस्थान आहे. याची ख्याती सर्वदूर पोहोचलेली आहे. येथील दुर्गामातेच्या प्रतिकृतीला ८५ वर्षांची वैभवशाली परंपरा लाभली असून येथील नवरात्र उत्सवात अनेक जाती- धर्माचे लोक एकत्र येऊन भक्तिभावाने देवीची आराधना करतात. तसेच गडचिरोली शहरातील कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळच्या वतीनेसुद्धा दुर्गा उत्सव मोठ्या उत्साहात केला जातो. विशेष म्हणजे हे मंडळ दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवते. २६ जुलैला कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो. विविध सामाजिक कार्यक्रमसुद्धा घेण्यात येतात. दुर्गा उत्सवानिमित्त अनेक भाविक येथे दर्शनाला येतात व देवीला नवस बोलतात. ही देवी नवसाला पावणारी म्हणून प्रसिद्द आहे. या मंडळाचे वैशिष्ट्य आहे की दरवर्षी, इथे भाविक नवस बोलतात आणि नवस पूर्ण झाल्यावर आपल्या परीने तो पूर्ण करतात. नवस पूर्ण झाल्यावर भेट म्हणून दुर्गा मातेची मूर्ती देतात. यावर्षीसुद्धा नवस पूर्ण झालेल्या भक्ताकडूनच देवीची मूर्ती मंडळाला भेट स्वरूपात प्राप्त झाली आहे. कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष उदय धकाते सन २००० पासून या चौकामध्ये कारगिल युद्धातील शहीद जवानांच्या स्मृतिप्रित्यर्थ स्मारकासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करत होते. त्यांच्या या प्रयत्नाला यश प्राप्त झाले असून येथे भव्य कारगिल स्मारक तयार झाले आहे. यंदा कारगिल दुर्गा उत्सव मंडळने गरबा-दांडियात उत्कृष्ट नूत्य करणाऱ्या भक्ताला एक ग्रॅम सोन्याची चपलाकंठी बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. सहभागी स्पर्धाकाला खास कुपन देण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष उदय धकाते यांनी दिली आहे.

——————————————-