जिल्हाधिकारी म्हणाले आदर्श आचारसंहितेचे नियम पाळा

103

ग्लोबल गडचिरोली न्यूज ,

गडचिरोली,ता. १९ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्याने जिल्ह्यात आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये जिल्ह्यात विविध बाबींवर निर्बंध लागू केले आहे. निर्बंध आदेश निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत अंमलात राहणार असून संबंधित सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दैने यांनी केले आहे

शासकीय कार्यालय व विश्रामगृहे परिसरात सभा घेण्यास निर्बंध आहेत. जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय/संस्था आणि शासकीय विश्रामगृहाच्या आवारामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने किंवा त्यांच्या हितचिंतकाने सभा घेण्यास मनाई करण्यात आली आहे. शासकीय आवारात राजकीय कामासाठी रॅली काढणे, निवडणुकीसंबंधाने पोस्टर्स, बॅनर्स, पॉम्प्लेट्स, कटआऊट, पेंटींग्स, होर्डीग्ज लावणे, निवडणूक विषयक राजकीय घोषवाक्य लिहीणे किंवा या आवारात निवडणूक विषयक घोषणा देणे किंवा मतदाराला प्रलोभन दाखविणे आणि निवडणूकीच्या कामात बाधा निर्माण होईल, अशी कृती करण्यास निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहे. सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरणास प्रतिबंध नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामीण भागात निवडणूकीच्या कालावधीमध्ये होर्डीग्ज, बॅनर्स, पोस्टर्स व भिंतीवर जाहीरात प्रदर्शीत करताना संबंधित स्थानिक प्राधिकरणाची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे. तसेच परवानगी संपल्यानंतर ते दूर(नष्ट) करून इमारती, मालमत्ता पूर्ववत करून घेणे, जाहिराती तत्काळ काढून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे निवडणुकीच्या कालावधीमध्ये शासकीय/निमशासकीय सार्वजनिक

मालमत्तेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात विद्रुपता करण्यास निर्बंध लावण्यात आले आहेत. राजकीय पक्ष, निवडणूक लढविणारे उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी किंवा हितचिंतकांनी तसेच मुद्रणालयाच्या मालकाने व इतर सर्व माध्यमांद्वारे छपाई करणाऱ्या मालकाने तसेच प्रकाशकाने इतर उमेदवाराचे नाव व त्यांना नेमून देण्यात आलेली चिन्हे वापरणे, नमुना मत पत्रिकेसाठी आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे कागद वापरणे व आयोगाने निश्चित केलेल्या कागदाच्या आकारामध्ये नमुना मतपत्रिका छपाईस निर्बंध आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्यावर कोणत्याही राजकीय पक्षाने, व्यक्तीने, संघटनेने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने किंवा त्याच्या प्रतिनिधीने किंवा त्याच्या हितचिंतकाने धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निर्बंध राहील. सार्वजनिक ठिकाणाजवळ तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यास निर्बंध जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, रुग्णालये किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणाच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यावर निर्बंध लावण्यात आले आहेत. जात, धर्म, भाषावार शिबिरांच्या आयोजनास निर्बंध आहेत. जिल्ह्यात कुठेही कसल्याही प्रकारचे जात/ भाषा/ धार्मिक शिबिरांच्या /मेळाव्यांच्या आयोजनावर निर्बंध राहील. मोटारगाड्या /वाहनांच्या ताफ्याचा वापर करण्यास निर्बंध राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी दहापेक्षा अधिक मोटार गाड्या/वाहनांच्या ताफ्याचा वापर करण्यास प्रतिबंध राहील. प्रचार वाहनावर कापडी फलक/ झेंडे लावण्यावर निर्बंध निवडणूक प्रचार मोहिमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार तसेच निवडणूक लढविणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतक हे निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर पक्ष प्रचाराचे फलक लावणे, झेंडे लावणे आदी बाबींसाठी बंधन राहील. यानुसार फिरत्या वाहनांवर पक्ष प्रचाराचा झेंडा हा वाहनाच्या डाव्या बाजूला विंडस्क्रिन ग्लासच्या पुढे राहणार नाही आणि तो त्या वाहनाच्या टपापासून २ फुट उंची पेक्षा जास्त राहणार नाही. प्रचाराच्या फिरत्या वाहनांवर कापडी फलक वाहन चालकाच्या आसनामागे वाहनाच्या डाव्या व उजव्या बाजुने लावण्यात यावा, इतर कोणत्याही बाजुस तो लावता येणार नाही. तसेच फिरत्या वाहनांवर लावायचा पक्ष प्रचाराचा झेंडा किंवा कापडी फलक संबंधित पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेदवार व उमेदवाराचे निवडणूक प्रतिनिधी निवडणूक प्रचारासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून अधिकृत परवानगी घेतलेल्या वाहना व्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनांवर लावता येणार नाही. निवडणुकीच्या प्रचारासाठी ध्वनिक्षेपकाचा वापर पोलिस अधिकारी यांच्या परवानगीशिवाय करता येणार नाही. सकाळी ६ पूर्वी आणि रात्री १० वाजतानंतर कोणत्याही फिरत्या वाहनावर व कोणत्याही क्षेत्रात ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. दिवसा प्रचाराकरिता फिरणाऱ्या वाहनांनी ध्वनिक्षेपकाचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबूनच करावा, ध्वनिक्षेपकाच्या आवाजासह फिरणाऱ्या वाहनास प्रतिबंध असेल. सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार आणि इतर व्यक्तींनी निश्चित ठिकाणी ध्वनी क्षेपकाच्या वापरासंबंधित घेतलेल्या परवानगीची माहिती संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व सबंधित यंत्रणेस कळविणे बंधनकारक राहील. तसेच कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर, रहदारीस अडथळा होईल किंवा अपघात होईल अशा ठिकाणी निवडणुकीसंबंधी पोस्टर, बॅनर्स, पॉम्पलेटस, कटआऊट्स, होर्डिंग्ज, कमानी लावणे किंवा निवडणुकीचे साहित्य लावण्यास मनाई राहील.निवडणूक प्रचारासाठी कोणत्याही व्यक्तीगत जागा, इमारत, आवार, भिंत आदीचा संबंधित जागा मालकाचे परवानगीशिवाय व सबंधीत परवाना देणाऱ्या प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय वापर करण्यास निर्बंध राहील, असेही कळविण्यात आले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करताना वाहनांच्या ताफ्यामध्ये तीनपेक्षा जास्त मोटारगाड्या /वाहने यांचा समावेश नसावा. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या १०० मीटर परिसरात तसेच दालनात पाच व्यक्ती व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल करना कार्यालयाच्या परीसरात मिरवणूक /सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे/ वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणणे आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास प्रतिबंध आहे. हे आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (२५ नोव्हेंबर २०२४) अंमलात राहतील.

—————————————