कोपर्शीच्या जंगलात थरार…पोलिसांनी ठार केले पाच माओवादी

207

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. २२ : आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये विध्वंसक कारवाया करण्याचा माओवाद्यांचा प्रयत्न गडचिरोली पोलिसांनी भामरागड तालुक्यातील कोपर्शीच्या जंगलात पाच माओवाद्यांना कंठस्नान घालत हाणून पाडला. या चकमकीत ठार झालेल्यांमध्ये दोन डीव्हीसीएम (Divisional committee member) दर्जाच्या वरीष्ठ कॅडरसह तीन दलम सदस्यांचा समावेश आहे.

आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये विध्वंसक कारवाया करुन घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने मागील तीन ते चार दिवसांपासून काही माओवादी एकत्र येऊन कट रचण्याच्या तयारीत असून ते गडचिरोली, महाराष्ट्र व नारायणपूर, छत्तीसगड सीमेलगत असलेल्या भामरागड तालुक्यातील कोपर्शी जंगल परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी तळ ठोकून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरुन वरीष्ठांच्या मार्गदर्शनात शनिवार (ता. १९) अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख व अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश यांच्या नेतृत्वात गडचिरोली पोलिस दलातील विशेष अभियान पथकाच्या २१ तुकड्या व सीआरपीएफ क्युएटीच्या २ तुकड्या तातडीने कोपर्शी जंगल परीसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी माओवादविरोधी अभियान राबविण्यासाठी रवाना करण्यात आल्या. पोलिस जवान माओवादविरोधी अभियान राबवित असताना सोमवार (ता. २१) सकाळी ७ वाजताच्या सुमारास जंगलात दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार सुरू केला. पोलिस जवानांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. पोलिसांचा वाढता दबाव पाहून माओवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. सुमारे आठ तास चाललेल्या चकमकीनंतर या जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता, घटनास्थळावर २ पुरुष व ३ महिला असे एकूण ५ माओवादी मृतावस्थेत आढळले. मृतक माओवाद्यांची ओळख पटली आहे. या पाचही मृत माओवाद्यांवर एकूण ३८ लाख रुपयांचे बक्षिस सरकारने जाहीर केले होते. या मृत माओवाद्यांवर चकमक, जाळपोळ व खून आदी वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. यासोबतच सदर घटनास्थळावरुन ५ अग्निशस्त्र हस्तगत करण्यात पोलिस दलास यश आले आहे. या चकमकीत गडचिरोली पोलिस दलाचे एक पोलिस जवान (पोलिस अंमलदार) कुमोद प्रभाकर आत्राम हे जखमी झाले आहेत. अभियानादरम्यान त्यांना हेलिकॉप्टरच्या मदतीने तातडीने बाहेर काढण्यात आले असून त्यांना उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. हे माओवादविरोधी अभियान अपर पोलिस महासंचालक (विशेष कृती) सुनिल रामानंद, विशेष पोलिस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर संदिप पाटील, पोलिस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, पोलिस उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ अजय कुमार शर्मा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनात अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश यांच्या नेतृत्वात सी-६० आणि सीआरपीएफ क्युएटीच्या कमांडोंनी पार पाडले, अशी माहिती मंगळवार (ता. २२) पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परीषदेत देण्यात आली. सन २०२१ पासून गेल्या तीन वर्षांत गडचिरोली पोलिसांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ८५ कट्टर माओवाद्यांना कंठस्नान, १०९ माओवाद्यांना अटक करण्यात आली आहे व ३७ माओवाद्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. सलग ७२ तास चाललेल्या या खडतर अभियानादरम्यान सी – ६० व क्युएटी जवानांनी दाखविलेल्या या शौर्यपूर्ण कामगिरीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी कौतुक केले आहे. तसेच या भागात माओवादविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले असून पून्हा एकदा सर्व माओवाद्यांना आत्मसमर्पण करून आपले जीवनमान उंचाविण्याचे आवाहन केले आहे. यात १) जया ऊर्फ भुरी पदा ( वय ३१) रा. उलीया, ता. पाखांजूर, जि. कांकेर (छत्तीसगड),पद – कंपनी नं. १० ची डिव्हीसीएम, सरकारने जाहिर केलेले बक्षिस – १६ लाख रुपये, गुन्हे -चकमक – ३१, जाळपोळ – ३, खून – ४, इतर – ११, एकूण –४९ गुन्हे, सावजी ऊर्फ अंकलू दसरू तुलावी ( वय ६५) रा. गुरेकसा, ता. धानोरा, जि. गडचिरोली पद – सप्लाय टिम डिव्हीसीएम, बक्षिस – १६ लाख रुपये, गुन्हे – चकमक –८४, जाळपोळ – ३८, खून – ५४, इतर – ५०, एकूण -२२६ गुन्हे, देवे ऊर्फ रिता ( वय २५) रा. बस्तर एरीया (छत्तीसगड) पद – सप्लाय टिम दलम सदस्य, बक्षिस – २ लाख रुपये, इतर माहिती प्रतिक्षेत, बसंत, रा. बस्तर एरीया (छत्तीसगड) पद – सप्लाय टिम दलम सदस्य, बक्षिस – २ लाख रुपये, गुन्हे – चकमक – ५, जाळपोळ – १, इतर –४, एकूण – १० गुन्हे, सुखमती, रा. बस्तर एरीया (छत्तीसगड) पद – कंपनी क्र. १०, मृत डिकेएसझेडसीएम रूपेश मडावी याची अंगरक्षकतथा दलम सदस्य, बक्षिस – २ लाख रुपये, इतर माहिती प्रतिक्षेत आहे.

  • ———————————————