मित्रपक्ष म्हणतात आमदार डॉ. देवराव होळींनाच उमेदवारी द्या

240

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. २२ : भाजपने जाहिर केलेल्या विधानसभा उमेदवारांच्या पहिल्या यादीत भाजपचे विद्यमान आमदार डाॅ. देवराव होळी यांचे नाव न आल्याने महायुतीमधील राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार), शिवसेवा (शिंदे) व इतर पक्ष अस्वस्थ झाले असून त्यांनी मंगळवारी पत्रकार परीषद आयोजित करत डाॅ. होळी यांनाच आमचा पाठींबा असून त्यांनाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व आमदार होळी मित्रपरिवारातील नेत्यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या पत्रकार परिषदेत महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी म्हणाले की, आमदार डॉ. देवराव होळी यांनी गडचिरोली विधानसभा क्षेत्रातच नाही, तर संपूर्ण जिल्ह्यात यापूर्वी कधीच न झालेला विकास करून दाखवला आहे. त्यांनी भाजपसोबतच मित्र पक्षांच्या सर्व नेत्यांना सोबत घेऊन काम केले आहे. त्यामुळे विकासकामांच्या आधारावर त्यांचा विजय निश्चित आहे. त्यामुळे जिंकून येणाऱ्या डॉ. देवराव होळींनाच आमचा पाठिंबा असून भारतीय जनता पक्षाने आमदार डॉ. देवराव होळी यांनाच उमेदवारी द्यावी. आमदार डॉ. देवराव होळी यांनी शासनाशी, प्रशासनाशी संघर्ष करून अखेर जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणले. त्यामुळे जिल्ह्यात वैद्यकीय सोयीसुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार असून जिल्ह्यातील स्थानिकांनाही वैद्यकीय शिक्षण घेणे सोयीचे झाले आहे. कोटगल बॅरेज, अनेक उपसा सिंचन योजना आणून शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचनाची मोठी सुविधा उपलब्ध करून दिली, जिल्ह्याने उद्योग क्षेत्रात उंच भरारी घेतली, जिल्ह्यात रस्ते, पुलांसाठी शेकडो कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. जिल्ह्यात मागील ५० वर्षांत न झालेली विकासकामे करून या क्षेत्राचा कधी नव्हे एवढा विकास करून दाखवलेला आहे. अशा विकासाची दृष्टी असणाऱ्या आमदार डॉ. देवराव होळी यांना निवडणुकीत पराभूत करणे इतर कोणत्याही पक्षांना कठीण आहे. त्यामुळे भाजपने त्यांनाच उमेदवारी द्यावी, असे सांगण्यात आले.

महायुतीचे मित्रपक्ष आमदार डाॅ. देवराव होळी यांच्या उमेदवारीच्या मागणीची तिव्रता दाखवण्यासाठी शक्तीप्रदर्शनही करणार आहेत. त्यासाठी शुक्रवार (ता. २५) शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), आमदार डॉ. देवराव होळी मित्र परीवार व समर्थकांचा २५ हजार कार्यकर्त्यांचा मेळावा गडचिरोली येथे आयोजित करण्यात येणार असल्याचे पत्रकार परीषदेत सांगण्यात आले.या पत्रकार परीषदेला शिवसेना (शिंदे) सहसंपर्कप्रमुख हेमत जंबेवार, भारतीय जनता पक्षाच्या जिल्‍हा महामंत्री योगिता पिपरे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) जिल्‍हा उपाध्यक्ष योगेश नांदगावे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष विवेक बामनवाडे, राष्ट्रवादी काँग्रेस ए. टी. जिल्‍हाध्यक्ष किशोर बावणे, शिवसेना जिल्‍हाप्रमुख राकेश बेलसरे, भारतीय जनता पक्ष जिल्‍हा सचिव दिलीप चलाख, भारतीय जनता पक्ष जिल्‍हा सचिव साईनाथ बुरांडे, भारतीय जनता युवा मोर्चा जिल्‍हा महामंत्री मधुकर भांडेकर, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्‍हा संघटक सचिव संजय शिंगाडे, भाजप शहराध्यक्ष मुक्तेस्वर काटवे तसेच घटक पक्षाचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

—————————————-