मोटारसायकली एकमेकांना धडकताच खाली पडलेल्या महिलेला ट्रकने चिरडले

270

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

कोरची,ता.७ : दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक झाल्यानंतर रस्त्यावर पडलेल्या पाच जणांच्या अंगावरून सुरजागड लोहखाणीचा लोहखनिज भरलेला ट्रक गेल्याने एक महिला जागीच ठार, तर चार जण गंभीर जखमी झाले. हा अपघात गुरुवार (ता. ७) दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास कोरची तालुक्यातील बेळगावनजीकच्या कोसमी गावाजवळ घडला. सेवाबाई रामसाय कोरेटी(वय ३५),रा.दामेसरा, ता.कुरखेडा असे मृत महिलेचे, तर रमशीला दसरू काटेंगे(वय ३६), रा.दोडके (छत्तीसगड), माणिक नरेटी (वय २५), रा.गोठणपार,ता.देवरी,जि.गोंदिया, दर्शना माणिक हलामी(वय २२) व सोनम मडावी(वय २४) अशी जखमींची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार सेवाबाई कोरेटी व रमशीला काटेंगे या दोन बहिणी भाऊबिजेसाठी चिलमटोला येथील आपल्या माहेरी गेल्या होत्या. गुरुवारी कोरचीचा आठवडी बाजार असल्याने त्या माणिक नरेटी या नातेवाईक युवकासोबत मोटारसायकलने बाजाराला जात होत्या. समोरून सोनम मडावी हा दर्शना हलामी यांना घेऊन मोटारसायकलने येत होता. कोसमी गावाजवळ दोन्ही मोटारसायकलींची समोरासमोर धडक झाली. यामुळे पाचही जण खाली पडले. एवढ्यात समोरून सुरजागड लोहखाणीतून लोहखनिज घेऊन येणारा सीजी ९७- एवाय १५३७ क्रमांकाचा ट्रक त्यांच्या अंगावरून गेला. या भीषण अपघातात सेवाबाई कोरेटी ही जागीच ठार झाली. उर्वरित चार जण गंभीर जखमी झाले. त्यांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पोलिसांनी ट्रक जप्त केला असून ट्रकचालक फरार आहे. या अपघातातील दर्शना हलामी यासुद्धा भाऊबिजेसाठी नांदळी या माहेरगावी गेल्या होत्या. आपल्या गावाकडे परतत असताना त्यांनाही अपघाताला सामोरे जावे लागले. दरम्यान घटनेच्या वेळी कोरची येथे एका कार्यक्रमानिमित्त आलेले महायुतीचे उमेदवार कृष्णा गजबे यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींबद्दल विचारपूस केली आणि संबंधितांना आवश्यक सूचना केल्या. तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार रामदास मसराम हे प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनासाठी कोरची येथे आले होते. त्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी कार्यक्रम थांबवून आपल्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळ गाठले व लगेच रुग्णवाहिका बोलावून रुग्णांना रुग्णालयात दाखल केले. सुरजागड येथून लोहखनिज उत्खनन करणाऱ्या कंपनीने मृत महिलेच्या आणि जखमींच्या परिवारांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष नसरुद्दीन भामानी यांच्यासह येथील नागरिकांनी केली आहे.

————————————