ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. २३ : राज्यातील विविध विधानसभांसह गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, अहेरी व आरमोरी या तिन्ही विधानसभांचा निकाल शनिवार (ता. २३) जाहीर झाला. मतदारांनी प्रमुख पक्षांनाच पसंती दर्शवली असून गडचिरोली विधानसभेत भाजप-महायुतीचे डाॅ. मिलिंद नरोटे, अहेरी विधानसभेत राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार) पक्षा तथा महायुतीचे धर्मरावबाबा आत्राम तसेच आरमोरी विधानसभेत काॅंग्रेस तथा महाविकास आघाडीचे रामदास मसराम विजयी झाले आहेत.
जिल्ह्याच्या तिनही विधानसभा मतदार संघांत सरासरी ७५. २६ टक्के मतदान झाले होते. यात आरमोरी विधानसभा मतदार संघात ७६. ९७ टक्के, गडचिरोली विधानसभा मतदार संघात ७४. ९२ टक्के, तर अहेरी विधानसभा मतदारसंघात ७३. ८९ टक्के मतदान झाले. गडचिरोली जिल्ह्यात एकूण ४ लाख १२ हजार १५१ पुरुष मतदार, ४ लाख ९ हजार २९४ महिला आणि १० तृतीयपंथी असे एकूण ८ लाख २१ हजार ४५५ मतदार आहेत. त्यापैकी ३ लाख १४ हजार ९३५ पुरुष, ३ लाख ३ हजार २९६ महिला व ५ तृतीयपंथी अशा एकूण ६ लाख १८ हजार २३६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे यंदाच्या मतदानात महिलांचा सहभाग लक्षणीय होता.
ही विधानसभा निवडणूक सुरवातीपासूनच रंगतदार ठरली होती. दोनदा गडचिरोली विधानसभा काबिज करणारे डाॅ. देवराव होळी यांना डच्चू देत भाजपने डाॅ. मिलिंद नरोटे या ताज्या दमाच्या युवा चेहऱ्याला जनतेपुढे आणले. भाजपचा हा निर्णय अगदी योग्य ठरला असून पक्षाने दाखवलेल्या विश्वासाला डाॅ. मिलिंद नरोटे यांनी सार्थ ठरवत विजय प्राप्त केले. डाॅ. मिलिंद नरोटे हे अगदी नवा चेहरा असले, तरी मतदारांनी त्यांना पसंती दिली. गडचिरोलीत काॅंग्रेसकडे फारसे दमदार उमेदवार नव्हेत. त्यांनी अखेरीस जिल्हा परीषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर पोरेटी यांच्या रूपात विधानसभेत नवाच चेहरा दिला. त्यामुळे ही लढत तुल्यबळच झाली. आधी टपाली मतमोजणीत डाॅ. मिलिंद नरोटे पुढे होते. मग मधल्या काही फेरींमध्ये मनोहर पोरेटींनी त्यांना मागे टाकले होते. पण २० व्या फेरीनंतर डाॅ. नरोटे यांनी निर्णायक आघाडी घेत पोरेटी यांना पराभूत केले.
आरमोरी विधानसभेत भाजपने कोणताही धोका न पत्करता दोनदा विजयी झालेले आमदार कृष्णा गजबे यांनाच पुन्हा उमेदवार देत पहिल्याच यादीत त्यांचे नाव जाहीर केले. पण येथे धक्कादायक निकाल लागला असून भाजप- महायुतीची घोर निराशा झाली आहे. या विधानसभेतही काॅंग्रेसपुढे उमेदवारीचा पेच होता. पक्षश्रेष्ठींनी माजी आमदार आनंदराव गेडाम यांना उमेदवारी नाकारत अगदी नवखे असलेले रामदास मसराम यांना संधी दिली. त्यामुळे संतप्त आनंदराव गेडाम काॅंग्रेसमधून बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिले. मात्र त्यांना फार मते मिळालीच नाहीत. त्यामुळे नवखे उमेदवार असलेले काॅंग्रेस महाविकास आघाडीचे रामदास मसराम यांनी सलग दोनदा आमदार राहिलेले कृष्णा गजबे यांचा पराभव केला. अहेरी विधानसभेतील राजकीय नाट्याने अवघ्या महाराष्ट्र राज्याचेच लक्ष वेधून घेतले होते. आजवर या विधानसभेत काका-पुतण्या अशी राजकीय चढाओढ असायची. पण राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार) पक्षाचे उमेदवार धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्येने (भाग्यश्री आत्राम) वेगळे होत थेट राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश करून पित्याविरोधातच उमेदवार म्हणून मैदानात उतरल्या. त्यानंतरच आरोप-प्रत्यारोप, प्रचाराचा धुरळा उडाला होता. पण अखेरच्या टप्प्यात ही लढाई तिहेरीऐवजी दुहेरी झाली. येथे पुतण्या अम्ब्रीशराव आत्राम यांचा पराभव करत धर्मरावबाबा आत्राम विजयी झाले. अम्ब्रीशराव आत्राम द्वितीय, तर भाग्यश्री आत्राम तृतीय स्थानी राहिल्या.










