पेनगुंडा, मिडदापल्ली गावांनी केली माओवाद्यांना गावबंदी

54

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ५ : सध्या माओवाद्यांचा सप्ताह सुरू असून या नक्षल सप्ताहादरम्यान भामरागड तालुक्यातील पेनगुंडा व मिडदापल्ली गावातील नागरिकांनी गुरुवार (ता.५) माओवाद्यांना गावबंदीचा ठराव संमत केला आहे. विशेष म्हणजे मागील काही महिल्यांत जिल्ह्यातील १९ गावांनी माओवाद्यांना गावबंदी केली आहे.

माओवादाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी शासन विविध योजना राबवित असते. सन २००३ पासून शासनामार्फत नक्षल गावबंदी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या अनुषंगाने गडचिरोली पोलिस दलामार्फत पोलिस दादालोरा खिडकिच्या माध्यमातून प्रोजेक्ट उडान अंतर्गत पुरविण्यात आलेल्या विविध शासकीय योजनांच्या लाभामुळे गेल्या काही महिन्यांतच गडचिरोली जिल्ह्यातील एकूण १९ गावांनी माओवाद्यांना गावबंदीचा ठराव एकमताने संमत केला होता. गुरुवारी भामरागड उपविभागाअंतर्गत धोडराज पोलिस स्टेशनच्या हद्दीतील पेनगुंडा येथे पोलिस दलामार्फत घेण्यात आलेल्या बैठकी दरम्यान गावातील नागरिकांनी एकत्रितपणे येऊन सर्वानूमते माओवाद्यांना गावबंदी करून त्याबाबतचा ठराव धोडराज पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना सादर केला. तसेच मिडदापल्ली गावातील ग्रामस्थांनी याआधी यावर्षीच माओवाद्यांना गावबंदीचा ठराव मंजुर केला असून त्यांनीही गुरुवारीच पोलिस विभागाला विकासकामांसाठी सहकार्य करण्याच्या ठरावावर एकमताने स्वाक्षरी केली. या बैठकी दरम्यान पोस्टे धोडराजचे प्रभारी अधिकारी यांनी ग्रामस्थांना मोबाईन टॉवर, रोड पुल या विषयीचे महत्व पटवुन दिले. तसेच माओवाद्यांची भीती न बाळगता त्यांच्या दमदाटीस न जुमानता आपल्या मुलाबाळांच्या भविष्याचा विचार करून माओवाद्यांना कुठल्याही प्रकारची मदत न करण्याचे आवाहन केले.ही गावे गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर स्थित असून माओवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणा­ऱ्या अबुझमाड परीसराच्या अगदी जवळ असल्याने या गावांमध्ये माओवाद्यांचे वर्चस्व होते. त्यामुळे जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनास त्यांच्यापर्यंत पोहचण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे येथील नागरिक हे शासनाप्रती उदासीन होते. परंतू मागील तीन वर्षांमध्ये गडचिरोली पोलिस दलाच्या पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून प्रोजेक्ट उडानअंतर्गत विविध जनजागरण मेळावे, दिव्यांग मेळावे, कृषी सहली, कृषी मेळावे, आरोग्य मेळावे, महिला मेळावे आदींच्या माध्यमातून येथील गावकऱ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहचविण्यात पोलिस यशस्वी झाले. त्यामुळे पोलिस दलाच्या प्रती येथील गावक­ऱ्यांचा विश्वास दृढ झाला. माओवाद्यांकडून पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून करण्यात आलेल्या निष्पाप गावक­ऱ्यांच्या हत्या व मारहाण, नुकसानीच्या विविध घटना, गावांच्या विकासकामात आणण्यात येणारे अडथळे, जनतेला दाखविण्यात येणारा धाक आदी घटनांमुळे माओवादी हे जनतेची दिशाभूल करत आहेत हे गावकऱ्यांच्या लक्षात आले. त्याचाच परिपाक म्हणून सोमवारी पेनगुंडा व मिडदापल्ली गावातील ग्रामस्थांनी बैठकी दरम्यान माओवाद्यांना गावबंदी करत पोलिस प्रशासनास सहकार्य करण्याबाबतचा ठराव संमत केला. तसेच यापुढे गावामार्फत माओवादी संघटनेस जेवण, राशन, पाणी देणार नाही, त्यांना कसल्याही प्रकारची मदत करण्यात येणार नाही, गावातील नागरिक स्वत: किंवा त्यांच्या मुलाबाळांना माओवादी संघटनेत सहभागी होऊन कोणत्याही प्रकारचे काम करणार नाही किंवा त्यांचे प्रशिक्षण घेणार नाही, माओवाद्यांच्या बैठकीला जाणार नाही तसेच माओवाद्यांना खोट्या प्रचारास बळी पडणार नाही, असे सांगितले. हा उपक्रम पार पाडण्यात भामरागडचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमर मोहिते, धोडराज पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अमोल सूर्यवंशी यांनी महत्वाची भूमिका बजावली. माओवाद्यांना गावबंदी ठराव करणा­ऱ्या गावांतील नागरिकांचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, अहेरीचे अपर पोलिस अधीक्षक श्रेणीक लोढा यांनी अभिनंदन केले. अबुझमाड जंगल परीसरातील इतर गावातील नागरिकांनी माओवाद्यांच्या खोट्या प्रचाराला बळी न पडता स्वत:च्या व गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहावे. गडचिरोली पोलिस दल सदैव तुमच्या पाठीशी असून गडचिरोली जिल्ह्यास माओवादीमुक्त जिल्हा करण्यात अशाच प्रकारची मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.

—————————————-