ग्लोबल गडचिरोली न्यूज
डाॅ. देवराव होळी
वैद्यकीय क्षेत्रात नामवंत असतानाच जनसेवेसाठी राजकीय क्षेत्रात पदार्पण करत सलग दोन टर्म गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारे माजी आमदार डाॅ. देवराव होळी खऱ्या अर्थाने जिल्ह्याच्या विकासाचे शिलेदार आहेत. २०१४ मध्ये देशात नवी राजकीय क्रांती होत असताना याच राजकीय क्षितीजावर वैद्यकीय क्षेत्रातील या देवमाणसाचा उदय झाला. २०१४ मध्ये गडचिरोली विधानसभेत तब्बल ७०१८५ मते मिळवत ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. केवळ एकदाच नव्हे तर सलग दुसऱ्यांदा २०१९ मध्येही त्यांनी याहून अधिक ९७९१३ मते मिळवत पुन्हा आपली विजय पताका फडकवली. सलग दहा वर्षे मिळालेल्या आमदारकीच्या काळातील प्रत्येक क्षण त्यांनी या जिल्ह्याच्या विकासासाठीच वापरला. चिचडोह बॅरेजसारखे कित्येक रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावले. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडियाचा नारा दिला, तर महाराष्ट्रात तेव्हाही मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी मेक इन महाराष्ट्रचा नारा दिला. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन डाॅ.देवराव होळी यांनी मेक इन गडचिरोलीचा नारा दिला. केवळ नारा देऊनच थांबले नाही, तर त्यांनी कृतिपर कार्यक्रम सुरू केले. मेक इन गडचिरोलीच्या माध्यमातून अनेक बेरोजगारांच्या हातांना काम मिळवून दिले. नक्षलग्रस्त, अतिमागास, बेरोजगारीने गांजलेल्या या आजारी जिल्ह्याचे रोगनिदान या डाॅ. देवराव होळी यांनीच अचुक केले. एक डाॅक्टर जेव्हा रुग्णाला तपासून त्याचे रोगनिदान करतो तेव्हा तो तिथेच थांबत नाही, तर रुग्णावर योग्य औषधोपचार करून त्याला पूर्ण निरोगी करतो. डाॅ. होळी यांनीही आमदार होताच हेच कार्य हाती घेतले. मरणासन्न अवस्थेतील या आजारी जिल्ह्याला सतावणारे बेरोजगारी, उद्योगविहीनतेसारखे रोग समूळ नष्ट करण्याचा त्यांनी प्रण केला. जिल्ह्यात उद्योगविकासाला चालना देण्यासाठी त्यांनी उद्योगक्रांती यात्रा काढली. अनेक बेरोजगार तरुण, तरुणींना स्वबळावर रोजगार निर्मितीसाठी पाठबळ दिलं. भारतीय पुरातत्त्व विभागाने दुरुस्तीच्या नावाखाली रखडवलेल्या श्री क्षेत्र मार्कंडेश्वराच्या जीर्णोद्धाराच्या कार्याला गती देण्यासाठी त्यांनी गल्ली ते दिल्ली सर्वत्र कसोशिने प्रयत्न केले. जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयासाठीही त्यांनी परीश्रम घेतले. त्यांच्या स्वभावाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे राजकीय आकाशात गगन भरारी घेतानाही त्यांनी आपले पाय कायम जमिनीवर ठेवले. सामान्यातील सामान्य व्यक्ती, गरीब, गरजवंताला त्यांनी कधी निराश केलं नाही. प्रत्येकाशी आपुलकीने बोलणारे, आपल्या आमदारकीचा आव न आणता एखादा साधा कार्यकर्ता किंवा गावखेड्यातील व्यक्तीच्या खांद्यावर बिनधास्त हात ठेवून मन मोकळ्या गप्पा करणारे डाॅ.देवराव होळीसारखे लोकप्रतिनिधी आजच्या काळात औषधालाही सापडणार नाहीत. रस्ते, वीज, शिक्षण, पाणी, उद्योग अशा प्रत्येक क्षेत्रातील सुविधांसाठी ते झटत राहिले. त्यामुळेच यंदा महायुती त्यांना हॅट्रिक करण्याची संधी देईल, अशी सर्वांनाच आशा होती. या जिल्ह्यात निवडणुकीत हॅट्रिक करण्याची किमया कुणालाच जमली नाही. पण हा चमत्कार डाॅ. होळी निश्चितच करू शकले असते,असे आजही अनेकजण छातीठोक सांगतात. हीच त्यांच्या कार्याची पावती आहे. उमेदवारीसाठी डावलले गेल्यानंतरही मनात कोणताच किंतु न ठेवता त्यांनी महायुतीने निवडलेले उमेदवार डाॅ. मिलिंद नरोटे यांच्या विजयासाठीही सर्वतोपरी प्रयत्न केले. ज्या चामोर्शी तालुक्यात डाॅ. होळी यांचा प्रभाव आहे त्याच तालुक्याने डाॅ.नरोटे यांना तारून नेत आमदारकीच्या खुर्चीपर्यंत पोहोचवले. या सर्वाधिक समर्थक डाॅ. होळी यांचेच आहेत. पण त्यांनी वैयक्तिक कटूता मनात येऊ न देता पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाचा सन्मान करत त्यांनी निवडलेल्या उमेदवाराच्या विजयासाठी जिवाचे रान केले. त्यांना आमगाव विधानसभेची जबाबदारी देण्यात आली असली, तरी गडचिरोली विधानसभेतून महायुतीच्या उमेदवाराचा विजय सुनिश्चित करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ते प्रयत्नरत होते. सलग दहा वर्षे त्यांनी केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा मांडायचा झाल्यास एक दीर्घ ग्रंथच लिहावा लागेल. पण दहा वर्षांपूर्वीचे गडचिरोली विधानसभेचे रूप आणि आता आपल्याला प्रत्येक क्षेत्रात दिसत असलेला लक्षणीय सकारात्मक बदल याचे श्रेय त्यांना नक्कीच द्यावे लागेल. जागतिक मानवाधिकारदिनी जन्मलेले डाॅ.देवराव होळी यांनी इथल्या नागरिकांच्या विकासाच्या मानवाधिकारासाठी सातत्याने संघर्ष केला. आता ते आमदार नसले, तरी जनसेवेसाठी ते कार्यरत राहणारच आहेत. किंबहुना जिल्ह्याच्या विकासाचे स्वप्न डोळ्यात आणि जनतेच्या प्रेमाची आस काळजात ठेवणाऱ्या अशा दुर्मिळ लोकप्रतिनिधीने कार्यरत राहावे हीच जिल्हावासींची इच्छा आहे. त्यामुळे आज (१० डिसेंबर) त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांना शुभेच्छा देताना डाॅ. देवराव होळी यांचे जिल्हाविकासाचे स्वप्न पूर्ण व्हावे आणि जनतेचे त्यांना राजकारणातील उच्च स्थानी बघण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. वैद्यकीय क्षेत्रातील देव आणि राजकारणातील राव साहेब असलेल्या या जनप्रिय व्यक्तीमत्त्वाला वाढदिवसाच्या पुन:श्च कोटी कोटी शुभेच्छा !
– तिलोत्तमा समर हाजरा, मुख्य संपादक, ग्लोबल गडचिरोली न्यूज पोर्टल
————————————-