सलग ९ व्या वर्षीही गडचिरोली जिल्हा बँकेला राष्ट्रीय स्तरावरील ‘बँको ब्ल्यू रिबन’ प्रथम पुरस्कार

136

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १४ : देशातील सहकार क्षेत्राला बळकट करणाऱ्या जिल्हा सहकारी बँका व नागरी सहकारी बँका यांच्या कार्याला प्रोत्साहन मिळावे यासाठी दरवर्षी ‘बँको ब्ल्यू रिबन’ पुरस्कार देण्यात येतो. २०२४ या वर्षीच्या आर्थिक स्थितीवर राष्ट्रीय स्तरावरील प्रथम क्रमांकाचा बँको ब्ल्यू रिबन पुरस्कार गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मिळाला आहे. विशेष म्हणजे हा पुरस्कार या बँकेने सलग नवव्या वर्षीसुद्धा पटकावला आहे. या पुरस्काराचे वितरण २८ जानेवारीला लोणावळा येथे होणार आहे.

देशातील ३७० जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या श्रेणीत ज्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या आर्थिक वर्ष सन २०२३-२४ या वर्षात २५०० ते ३००० कोटी रुपयाच्या ठेवी असलेल्या श्रेणीत गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ठेव वृद्धी तसेच रिझर्व्ह बँक व नाबार्डच्या निकषानुसार बँकेचे एनपीएचे प्रमाण, सीआरएआर आदी निकषात बँक पात्र झाली आहे. ३१ मार्च २०२४ च्या आर्थिक स्थितीवर बँकेचे ग्रॉस एनपीए १.३० टक्के आहे. बँकेने आर्थिक निकषात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल बँको समितीने राष्ट्रीय स्तरावरचा सन २०२४ या वर्षाचा बँको ब्ल्यू रिबन पुरस्कार जाहीर केला आहे. यापुर्वी बँकींग फ्रंटीअर्सतर्फे सन २०१८, २०२२ व २०२४ या वर्षाचा उत्कृष्ट माहिती तंत्रज्ञानाचा प्रथम पुरस्कार व सन २०१६ ते २०२३ पर्यंत बँकेला सलग ८ वर्षे बँको ब्ल्यू रिबन पुरस्काराने बँकेला सन्मानित करण्यात आले आहे. बँकेच्या २०२४ च्या आर्थिक स्थितीवर एकूण ठेवी २०८७ कोटीच्या ठेवी असून ४००० कोटींच्या व्यवसायाकडे बॅंक वाटचाल करत आहे. बँकेच्या ठेववृद्धीमध्ये दरवर्षी १८ ते २० टक्क्यांनी वाढ होत आहे. ३१ मार्च २०२४ च्या आर्थिक स्थितीवर बँकेचे करंट अकाऊंट सेव्हिंग डिपॉझीटचे प्रमाण ७२ टक्के असून सर्वात जास्त कासा ठेव प्रमाण असणारी भारतातील पहिली बँक आहे. बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नुकतेच इंटरनेट बँकींगचा परवाना दिला असून हा परवाना प्राप्त होणारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही महाराष्ट्रातील पहिली बॅंक आहे. भारतातील एकूण ३७० जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांपैकी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकेच्या आर्थिक स्थितीच्या निकषावर देशातील केवळ ८ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना इंटरनेट बँकींगचा परवाना दिलेला आहे. गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती बँकेने ५७ शाखा व ३८ ए.टी. एम. च्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्राहकांना अत्याधुनिक बँकींग सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल जिल्ह्यातील शेतकरी, ठेवीदार, पगारदार, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, सदस्य, महिला बचतगटांचे सदस्य व हितचिंतक तसेच बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांचे वेळोवेळी मिळत असलेल्या सहकार्यामुळे बँकेला सन २०२४ चा बॅको ब्ल्यू रिबन पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचे नम्रपणे नमूद करत बँकेचे अध्यक्ष प्रंचित अरविंद पोरेड्डीवार, उपाध्यक्ष श्रीहरी भंडारी, मानद सचिव अनंत साळवे, बँकेचे संचालक व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

——————————————–