पुण्यातील स्पर्धेत गडचिरोली पोलिस दलाने पटकावली अनेक पदके

55

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली,ता. १६ : पुणे येथे पार पडलेल्या १९ व्या महाराष्ट्र राज्य पोलिस कर्तव्य मेळाव्यात गडचिरोली पोलिस दलाने विविध स्पर्धांमध्ये पदके पटकावली आहेत.

पोलिसांनी कौशल्याने तपास कसा करावा. तसेच त्यांना विविध प्रकारचे ज्ञान मिळावे, त्यांनी अपडेट राहावे, यासाठी पुणे येथे ७ ते १२ डिसेंबर २०२४ या कालावधीत १९ वे राज्यस्तरीय महाराष्ट्र राज्य पोलिस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पोलिसांनी व्यावसायिक नैपुण्य, गुणवत्ता कौशल्य, कार्यक्षमता व दर्जा वाढविणे हा मेळाव्या मागील उद्देश असून राज्य गुन्हे अन्वेषण विभागातर्फे या मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असते. या मेळाव्यामध्ये एकूण २५ वेगवेगळ्या विभागांनी आपला सहभाग नोंदविला होता. यामध्ये गडचिरोली पोलिस दलास सातवे स्थान मिळाले आहे. पुणे येथे आयोजीत १९व्या महाराष्ट्र राज्य पोलिस कर्तव्य मेळाव्यामध्ये सायंटिफिक एड टू इन्वेस्टीगेशन, पोलिस फोटोग्राफी, पोलिस व्हिडीओग्राफी, कम्प्युटर अवेअरनेस, अॅन्टी सॅबोटेज चेक, श्वान पथक आदी स्पर्धा घेण्यात आल्या. या सर्व स्पर्धांमध्ये लेखी, तोंडी परीक्षेबरोबरच प्रात्यक्षिक परीक्षाही घेण्यात आल्या. वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांमार्फत परीक्षण करण्यात आले. सहा दिवस चाललेल्या विविध स्पर्धांमध्ये नागपूर परिक्षेत्राला पाच बक्षिसे मिळाली. घातपात विरोधी तपासणी या स्पर्धेमधील ग्राउंड सर्च या उप-प्रकारात गडचिरोली पोलिस दलातीत बीडीडीएस शाखेतील पोलिस अंमलदार धम्मदीप मेश्राम हे रजत व पोलिस हवालदार पंकज हुलके हे कांस्य पदकाचे मानकरी ठरले. यासोबतच गडचिरोली पोलिस दलातील हनी या श्वानाने श्वान पथक स्पर्धेमधील एक्सप्लोसिव्ह डिटेक्शन या उप-प्रकारात कांस्य पदक पटकाविले. या यशाबद्दल गडचिरोली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी पदक प्राप्त जवानांचे व श्वानाचे कौतुक करत भविष्यात अशीच कामगिरी करण्याबाबत शुभेच्छा दिल्या.

——————————————