लाॅयड्स मेटल्स कंपनीचे नाव इतिहासात कोरले जाईल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

167

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

मुख्य संपादक, तिलोत्तमा समर हाजरा

गडचिरोली, ता. १ : गडचिरोली जिल्ह्याच्या विकासात्मक परिवर्तनाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा लॉयड कंपनीचे नाव सुवर्णाक्षरात लिहिले जाईल, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. नवे वर्ष २०२५ चा हा पहिला दिवस गडचिरोलीकरांसाठी सुख,समृद्धी आणि संपन्नतेचा संदेश घेऊन आला आहे. माओवादग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील माओवाद लवकरच इतिहास ठरेल. आता गडचिरोली जिल्हा महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर असेल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या पोलाद कारखान्यासह विविध प्रकल्पांचे बुधवार १ जानेवारी चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन आणि भूमिपूजन झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, लॉयड मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन, विशेष सल्लागार पद्मश्री डॉ. तुलसी मुंडा, पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार डाॅ. देवराव होळी, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, पोलिस महनिरीक्षक दिलीप भुजबळ, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, रवींद्र ओल्लालवार, तनुश्री आत्राम आदींची प्रमुख उपस्थिती होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या जिल्ह्यातील माओवाद संपला पाहिजे आणि इथल्या सामान्य माणसाला समाजाच्या आर्थिक, सामाजिक प्रवाहामध्ये आणता आले पाहिजे यादृष्टीने आमचे काम सुरू आहे. गडचिरोली जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनामुळे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्या मदतीमुळे आता माओवादाकडे कुणीही वळत नाही. मागील चार वर्षांमध्ये माओवादी संघटनांमध्ये गडचिरोलीतून एकही व्यक्तीची भरती झाली नाही. उलट माओवादी सरकारपुढे शरणागती पत्करून मुख्य धारेमध्ये येत आहेत. येत्या काळात माओवाद हा भूतकाळ असेल. आम्ही संपन्न आणि समृद्ध गडचिरोली घडविल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले. गडचिरोली जिल्ह्यात २५ वर्षांपासून खाणीसाठी प्रयत्न सुरू होते पण फार कुणाला येश येत नव्हते. २०१४ मध्ये मी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली त्यावेळी या विषयासंदर्भात बी. प्रभाकरन व श्री. गुप्ता यांनी माझी भेट घेतली होती. त्यावेळी खाण व पोलाद प्रकल्प उभारताना गडचिरोली जिल्ह्याला वसाहतीसारखे बनवू नका तर तिथल्या स्थानिकांना रोजगारासाठी आधी प्राधान्य द्या, अशी अट मी घातली होती.त्यांनी होकार दिला आणि त्यादृष्टीने कामही केले. पोलिस प्रशासनाच्या मदतीमुळेच माओवाद्यांचा विरोध असतानाही खाण सुरू झाली. आधी गैरसमज पसरवल्यामुळे स्थानिकांचा विरोध होता. पण, पुढे त्यांना हेच प्रगतीचे द्वार असल्याचे लक्षात आल्याने त्यांचेही सहकार्य मिळत आहे. कोनसरीच्या प्रकल्पाचे २०१८-१९ ला मी भूमिपूजन केले. त्याच प्रकल्पाचे उद्घाटन देखील करत असल्याचा मला आनंद आहे. पुढच्या टप्प्याचेही भूमिपूजन झाले आहे. जवळपास ६२०० कोटींची गुंतवणूक जिल्ह्यात आधीच झाली आहे व त्यामुळे ९ हजार लोकांना रोजगार मिळत आहे. पुढे २५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होऊन २० हजार स्थानिकांना रोजगार मिळणार आहे, असेही ते म्हणाले. आपल्या प्रास्ताविकातून कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी लायड्स मेटल्स कंपनीचा प्रवास कथन करताना सुरुवातीपासूनच या कार्याला सहकार्य केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्हावासींचे आभार मानले. कंपनीने सुरू केलेल्या काली अम्मल मेमोरीयल हाॅस्पिटलमध्ये ६३ हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार झाल्याचेही ते म्हणाले. या कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. विशेष म्हणजे याच सोहळ्यात कंपनीद्वारे कर्मचाऱ्यांना एक हजार कोटी रुपयांचे शेअर्स देण्यात आले. कंपनीच्या कामाच्या गतीमुळे पुढील पाच वर्षात शेअर्सचे मूल्य पाच पटीने वाढेल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच हे शेअर्स मिळाल्याने या कंपनीत काम करणारे कर्मचारीही मालक झाल्याचे ते म्हणाले. यावेळी पद्मश्री डॉ. तुलसी मुंडा यांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते कंपनीच्या १० हजार शेअर्सचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. याशिवाय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दोन शरणागत माओवाद्यांना आणि एलएमईएलच्या तीन कर्मचाऱ्यांनादेखील शेअर्स प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या प्रकल्पामध्ये रोजगारासाठी स्थानिकांचा सर्वाधिक विचार केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लॉईड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांचे अभिनंदन केले. प्रकल्पाच्या माध्यमातून बिरसा मुंडा यांनी घोषणा केल्याप्रमाणे जल, जमीन, जंगल हा अधिकार गडचिरोलीतील आदिवासी बांधवांना मिळत आहे.इथल्या पर्यावरणाला आम्ही नखसुद्धा लागू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. गोंडवाना विद्यापीठ आणि लाॅयड्सने ऑस्ट्रेलियातील कर्टीन विद्यापीठाशी करार केला आहे. त्यामुळे आता खाणीसंदर्भातील दर्जेदार प्रशिक्षण गडचिरोलीत मिळणार आहे. गडचिरोलीत विमानतळ होत आहे. समृद्धी महामार्गामुळे गडचिरोलीला मुंबईशी जोडत आहोत. जलमार्गे पोर्टद्वारे वाहतूक सुरू करणार आहोत, अशी माहितीही त्यांनी दिली.या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिमोटचे बटण दाबून विविध कामांचे उद्घाटन केले. यात कोनसरी येथे डीआयआर प्लांट (४०० कोटी रुपये गुंतवणूक, ७०० रोजगार), पेलेट प्लांट आणि स्लरी पाइपलाइन (३ हजार कोटी रुपये गुंतवणूक, १ हजार रोजगार), हेडरी, एटापल्ली येथे आयर्न ओर ग्राईडिंग प्लांट (२७०० कोटी रुपये गुंतवणूक, १५०० रोजगार), वन्या गारमेंट युनिट (२० कोटी रुपये गुंतवणूक, ६०० रोजगार) याचा समावेश आहे. शिवाय लॉयडस काली अम्मल हॉस्पीटल आणि लॉयड्स राज विद्यानिकेतन सीबीएसई शाळेचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. सुमारे १२०० विद्यार्थ्यांना येथे शिक्षण मिळणार आहे. पोलिसांसाठी निवासस्थाने, जिमखाना, बालोद्यान आदींचेही लोकार्पण करण्यात आले.

————————————–