पोलिसांच्या शिबिरात ११३८ रक्तदात्यांनी केले रक्तदान

76

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

मुख्य संपादक, तिलोत्तमा समर हाजरा

गडचिरोली, ता. ६ : महाराष्ट्र पोलिस स्थापनानिमित्त गडचिरोली पोलिस विभागाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ११३८ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. विशेष म्हणजे या रक्तदान शिबिरात महिलांनाही उत्स्फूर्त सहभाग घेतला.

महाराष्ट्र पोलिस स्थापनादिनानिमित्त २ ते ८ जानेवारीपर्यंत रेझिंग डे सप्ताह साजरा केला जातो. या कालावधीत पोलीस दलाकडून शस्त्र प्रदर्शन, स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती अभियान, रस्ता सुरक्षा रॅली, महिला सुरक्षा रॅली, सायबर अवेयरनेस आदी प्रकारच्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. यानिमित्ताने रविवार (ता.५) गडचिरोली पोलिस दलामार्फत पोलिस दादालोरा खिडकी ‘प्रोजेक्ट उडान’च्या माध्यमातून उपजिल्हा रुग्णालय, रक्तकेंद्र अहेरी, डॉ. हेडगेवार रक्तकेंद्र नागपूर, शालीनीताई मेघे रक्तपेढी, नागपूर व सावंगी यांच्या सहकार्याने पोलिस मुख्यालयातील पांडु आलाम सभागृहात तसेच उप-मुख्यालय प्राणहिता, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, सिरोंचा व पोलिस स्टेशन देसाईगंज येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गडचिरोली पोलिस दलातर्फे आतापर्यंत दोन रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये २१ ऑक्टोंबर २०२३ रोजी पोलिस स्मृतिदिनानिमित्त १०७१ व १४ जून २०२४ रोजी जागतिक रक्तदातादिनानिमित्त ५६९ अशा एकूण १६३१ रक्दात्यांनी रक्तदान केले आहे. रविवारी आयोजित रक्तदान शिबिरात पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, अहेरीचे अपर पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा, पोलिस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे, अहेरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी अजय कोकाटे, सिरोंचाचे उपविभागीय पोलिस अधिकारी संदेश नाईक, कुरखेड्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले तसेच विविध शासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासह गडचिरोली पोलिस दल, सीआरपीएफ, एसआरपीएफचे पोलिस अधिकारी व अंमलदार, यासोबतच पोलिस स्टेशन, उप पोलिस स्टेशन, पोलिस मदत केंद्र स्तरावरून आलेल्या नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. एकूण ११३८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिरादरम्यान पोलिस अधीक्षक नीलोत्पल रक्तदानाचे महत्त्व सांगताना म्हणाले की, मानवी रक्ताला कुठलाही पर्याय नाही. ज्या समाजात आपण राहतो त्याचे ऋण फेडायची ही एक संधी रक्तदानाने आपल्याला मिळत असते. तसेच समाजाचा एक जबाबदार घटक या नात्याने आपण सर्वांनी रक्तदान करणे काळाची गरज आहे. या शिबिरातच शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, ट्रायबल वेलफेअर कम्युनिटी, जीवनआधार बहुद्देशिय संस्था, रोटरी क्लब नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोबाईल हेल्थ क्लिनिक अॅम्ब्युलन्सचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आले. मोबाईल हेल्थ क्लिनिक अॅम्ब्युलन्स जनजागरण मेळावा तसेच आरोग्य मेळाव्यांमध्ये जाऊन दुर्गम-अतिदुर्गम भागातील नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करणार आहे व तपासणी दरम्यान ज्या नागरिकांना शस्त्रक्रियेची गरज आहे, अशा नागरिकांना मोबाईल हेल्थ क्लिनिकमधून नागपूर येथे नेऊन त्यांच्या रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांना आता त्यांच्या जवळील पोलिस स्टेशन, उप पोलिस स्टेशन, पोलिस मदत केंद्रात आपल्या आरोग्याच्या तपासणीची सुविधा या मोबाईल हेल्थ क्लिनिकच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाणार आहे. विविध ठिकाणी आयोजित रक्तदान शिबिरांपैकी गडचिरोली येथे उपजिल्हा रुग्णालय रक्तकेंद्र अहेरी, शालिनीताई मेघे रक्तकेंद्र नागपूर व डॉ. हेडगेवार रक्तकेंद्र नागपूर येथील टिम, पोलिस स्टेशन देसाईगंज व पोलीस उप-मुख्यालय अहेरी (प्राणहिता) येथे डॉ. हेडगेवार रक्तकेंद्र नागपूर येथील टिम तसेच सिरोंचा येथे उपजिल्हा रुग्णालय रक्तकेंद्र अहेरी येथील टीमने उपस्थित राहून रक्त संकलन करण्याचे काम केले व रक्तदान शिबिराला सहकार्य केले.या रक्तदान शिबिराप्रसंगी पोलिस अधीक्षक नीलोत्पल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरी विके (किलनाके), अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, डॉ. राजीव वर्भे, डॉ. प्रतीक्षा मायी, डॉ. ओबेद ओमान, अश्वीन रडके, जीवन जवंजाळ, रवींद्र वाटोळे, सुनिल मडावी उपस्थित होते.

——————————-