ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. १४ : मागील काही वर्षांत जिल्ह्याच्या विकासाला प्रचंड वेग आला असून दळणवळणाच्या सुविधा वाढत असताना आता जिल्ह्यात विमानतळही होऊ घातले आहे. पण या विमानतळाला जागा देण्यास पुलखल गावातील नागरिकांनी विरोध केला असून शिफारस देणार नसल्याचे निवेदन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना पाठवले आहे. त्यामुळे विमानतळाच्या निर्मितीत अनेक अडचणी येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
जिल्हाधिकारी पंडा यांना पाठवलेल्या निवेदनात पुलखलच्या ग्रामस्थांनी म्हटले आहे की, शेती हेच गावातील नागरिकांचे उपजिविकेचे एकमेव साधन असून विमानतळामुळे गावातील तलाव, बोडी, नाले, गुरे चराईचे झुडपी जंगल आणि शेतीक्षेत्र नष्ट होणार आहे. त्यामुळे कोटगल उपसा जलसिंचनाचे लाभक्षेत्र असलेल्या सूपीक शेतजमिनी विमानतळाकरिता भूसंपादीत करण्यासाठी ग्रामसभेची शिफारस देणार नाही, असा ठराव संमत करत पुलखल ग्रामसभेने गावाच्या हद्दीतील भूसंपादनास विरोध केला आहे. अनुसूचित क्षेत्रात समाविष्ट असलेल्या पुलखल ग्रामसभेने बुधवार (ता. १२) ग्रामसभा घेऊन हा ठराव संमत केला. या ठरावात ग्रामसभेने म्हटले आहे की, प्रस्तावित विमानतळ गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाकरिता मोलाचे योगदान देणारे ठरणार आहे. मात्र या विमानतळाकरिता प्रस्तावित ठिकाण हे आमच्या पुलखल गावातील व आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांच्या कोटगल बॅरेज व कोटगल उपसा सिंचन लाभक्षेत्रातील सुपीक जमिनीचे असून याच शेतजमिनींवर गावातील शेतकऱ्यांची उपजीविका अवलंबून आहे. पुलखल गावाच्या हद्दीतील तलाव, बोडी व झुडपी जंगलाची काही जमीन यात समाविष्ट असल्याने गावातील उर्वरित शेत जमिनीचे व गुरांच्या पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत नष्ट होणार आहेत. गडचिरोली – चंद्रपूर या महामार्गाला जोडणारा पुलखल गावाचा मुख्य रस्ताही कायमचा बंद होणार आहे. गावाचे पारंपरिक देवस्थान एकबोटी माऊली व इतर श्रद्धास्थानेही नष्ट होणार आहेत. तसेच मुरखळा गावाच्या हद्दीतून पुलखल -मुडझा गावाच्या सीमेवरून असलेल्या नाल्याला वैनगंगा नदीच्या पुराच्या पाण्याचा दाब ( बॅकवॉटर ) मोठ्या प्रमाणावर नैसर्गिकरीत्या असते. विमानतळामुळे हा नाला (वगर) बुजविल्या जाणार असल्याने पुलखल -मुडझा रस्त्याला व शेतीला पुराचा मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे विमानतळाकरिता पुलखल गावाच्या हद्दीतील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी, तलाव, बोडी, झुडपी जंगल, नाला (वगर) व इतर जमीन भूसंपादित करणे हे पुलखल गावातील शेतकरी व इतर नागरिकांवर भविष्यातील उपासमारी आणणारे, शेत जमिनींचे क्षेत्र कमी करणारे, जमिनीच्या मालकी हक्क आणि गावाच्या सामूहिक मालमत्तांच्या मालकी हक्क हिरावणारे ठरणार असल्याचे म्हटले आहे. पुलखल गावाच्या संबंधात अनुसूची क्षेत्रातील कायदे व नियमा अन्वये प्राप्त अधिकारानुसार विमानतळाकरिता पुलखल गावातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी गावाच्या सामूहिक साधन संपत्ती असलेल्या बोडी, तलाव, नाला व झुडपी जंगलाच्या जमिनीचे भूसंपादन करण्यात येऊ नये व त्या संबंधातील ग्रामसभेची शिफारस शासनाकडे करण्यात येऊ नये तसेच जिल्हा प्रशासनातर्फे ग्रामसभेकडे मागणी करण्यात आलेली भूसंपादनाची शिफारस आमच्या आजच्या ग्रामसभेने नाकारावी असा ठराव संमत करण्यात येत असल्याचेही ग्रामसभेने आपल्या ठरावात म्हटले आहे. पुलखल ग्रामसभेचा जिल्ह्यात होऊ घातलेल्या विमानतळाला अजिबात विरोद नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी एक पर्यायसुद्धा सरकारला सुचवला आहे. या विमानतळाकरिता कोटगल बॅरेज व कोटगल उपसा सिंचन लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या सुपीक शेत जमिनी, गावाच्या सामूहिक मालमत्ता असलेल्या बोडी, तलाव, नाले, झुडपी जंगल अशा जमिनींचे भूसंपादन करून अनुसूची क्षेत्रातील नागरिकांच्या अधिकारावर गदा आणण्याऐवजी चामोर्शी मार्गावरील सेमाना देवस्थानासमोरील व गडचिरोली शहराला लागून असलेल्या जंगलाच्या जागेत हे विमानतळ प्रस्तावित करण्यात यावे, अशी सूचना पुलखल ग्रामसभेने शासनाकडे केली आहे.









