चक्क यवतमाळ शहरात नाव बदलून राहत होता नक्षल कमांडर

231

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १९ : गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी असतात हे सगळ्यांनाच माहित आहे. पण चक्क यवतमाळ जिल्ह्यात एक नक्षल कमांडर मागील १३ वर्षांपासून नाव बदलून राहत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी शिताफीने या नक्षल कमांडरला अटक केली आहे.

छत्तीसगड राज्यातील नक्षल दलम कमांडरच्या मुसक्या आवळण्यात यवतमाळ पोलिसांना यश आले आहे. दिलीप उर्फ तुलसी मेहता असे या नक्षलवाद्याचे नाव आहे. १९९३ मध्ये झारखंडमधील नक्षली गटात तो भरती झाला होता. तर १९९७ मध्ये भीतीया दलमचा विभागीय कमांडर म्हणून त्याची नियुक्ती झाली होती. तर त्याला बारा सशस्त्र नक्षलवाद्यांचे नेतृत्व मिळाले होते. त्याच्यावर सुरक्षा दलावर हल्ले, खंडणी, सरकारी मालमत्तेची तोडफोड, असे अनेक हिंसक कारवाया प्रकरणी ६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मागील १३ वर्षांपासून नाव बदलून तो यवतमाळ जिल्ह्यात वास्तव्यास होता, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिली आहे