जय शिवराय’ च्या घोषणेत उत्साहात साजरी झाली शिवजयंती

88

ग्लोबल गडचिरोलीच न्यूज ,

गडचिरोली, ता. १९ : स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५ वी जयंती बुधवार (ता. १९) देशासह गडचिरोली जिल्ह्यात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित जय छत्रपती शिवाजी – जय भारत पदयात्रेने गडचिरोलीकरांचे लक्ष वेधले.

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणेअंतर्गत जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व जिल्हा प्रशासन गडचिरोलीच्या वतीने शासनाच्या निर्देशाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त जय छत्रपती शिवाजी – जय भारत पदयात्रेचे व विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्धाटन बुधवारी सकाळी ७.३० वाजता चामोर्शी मार्गावरील जिल्हा परिषद हायस्कुल येथे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, निवासी उपजिल्हाधिकारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पणाने करण्यात आली. आमदार डाॅ. मिलिंद नरोटे व जिल्हाधिकारी पंडा यांनी आपल्या मार्गदर्शनातून सहभागी विद्यार्थी, युवक – युवती, नागरीकांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. याप्रसंगी जिल्हा मुख्यालयातील अधिकारी उपस्थित होते. पदयात्रेला मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सकाळी ८ वाजता सुरुवात करण्यात आली. पदयात्रेचा मार्ग जिल्हा परिषद हायस्कुल ते शासकीय विश्रामगृहा जवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या पदयात्रेचे अंतर ३.५ कि.मी. इतके होते. या पदयात्रेत जिल्हा मुख्यालयातील शालेय विद्यार्थी, युवक-युवती, अधिकारी / कर्मचारी, नागरीक बहुसंख्येने उपस्थित होते. जवळपास ३ हजार लोकांनी पदयात्रेत सहभाग घेतला. पदयात्रेदरम्यान पाण्याचे स्टॉल, आरोग्यविषयक सुविधा, सुरक्षा व्यवस्था, वाहतूक व्यवस्था आदी सुविधा पदयात्रेदरम्यान प्रशासनाच्या वतीने पुरविण्यात आल्या होत्या. या पदयात्रेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारीत फलक, तैलचित्र, सांस्कृतिक वारसा जतन करणाऱ्या महत्त्वपूर्ण बाबींचे प्रदर्शन, झाकी, वेशभूषा आदींचा समावेश होता. विशेष म्हणजे आमदार डाॅ. मिलिंद नरोटे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, मुख्य कार्यकारी अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, मुख्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी पदयात्रेत सहभाग नोंदवून सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पदयात्रा पूर्ण केली. समारोपीय कार्यक्रम शासकीय विश्रामगृहाजवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परीसरात पार पडला. याप्रसंगी मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. त्यानंतर याठिकाणी शालेय विद्यार्थ्यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत सांस्कृतिक कार्यक्रम, नाटीका, व्याख्याने आदी कार्यक्रम आयोजीत करण्यात आले.

राज्यगीताने पदयात्रेचा समारोप करण्यात आला. संचालन ओमप्रकाश संग्रामे, जिल्हा युवा अधिकारी अमित पुंडे यांनी केले व आभार जिल्हा क्रीडाधिकारी भास्कर घटाळे यांनी मानले. कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी पंडा यांच्या मार्गदर्शनात जिल्हा मुख्यालयातील सर्व विभाग प्रमुखांनी सहकार्य केले.