राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी अमोल कुळमेथे यांची नियुक्ती

65

गड़चिरोली, ता. २१ : स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या वतीने ‘अजितपर्व पदाधिकारी संपर्क अभियान’ कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यावेळी अमोल कुळमेथे यांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक राकाँच्या ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव आखाडे यांच्या उपस्थितित गड़चिरोली शहराध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली. ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव आखाडे यांच्या हस्ते गडचिरोली शहराध्यक्ष म्हणून अमोल कुळमेथे यांना नियुक्तीपत्र वितरित करण्यात आले. नियुक्ती पत्र स्वीकारल्यानंतर अमोल कुळमेथे यांनी म्हटले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला गडचिरोलीच्या शहराध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकरिता तन-मन-धनाने प्रयत्न करणार तसेच गडचिरोली नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील राहणार, असे मत व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, प्रदेश चिटणीस युनूस शेख, तालुकाध्यक्ष विवेक बाबनवाडे, ओबीसी जिल्हाध्यक्ष संजय शिंगाडे, जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये, प्रा. विठ्ठल निखुले, विजय धकाते, फहीम काजी, अज्जू शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमोल कुळमेथे यांनी गडचिरोली शहराध्यक्ष होण्याचे श्रेय माजी मंत्री व विद्यमान आमदार डाॅ. धर्मरावबाबा आत्राम, जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर यांना दिले आहे.