गडचिरोली डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगमध्ये ईगल्सची शानदार विजययात्रा

115

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली,ता. २१ : गडचिरोली डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग 2025 अंतर्गत दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या रोमांचक सामन्यात चामोर्शी ईगल्स संघाने धनौरा रॉयल रायनोसवर 4 गडी राखून शानदार विजय मिळवला. या सामन्यात मान्यवरांच्या उपस्थितीत उत्कंठावर्धक लढत पाहायला मिळाली.

सामन्याच्या प्रारंभी आमदार डॉ. मिलिंद नारोटे यांच्या हस्ते नाणेफेक करण्यात आली, ज्यात चामोर्शी ईगल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. धनौरा रॉयल रायनोस संघाने प्रथम फलंदाजी करत 18.1 षटकांत 80 धावा करून सर्वबाद झाले. त्यांच्यासाठी निशांत सोनटक्के (23 धावा, 27 चेंडू) आणि लोकेश गावळे (22 धावा, 32 चेंडू) यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. चामोर्शी ईगल्सच्या गोलंदाजांमध्ये नितीन शेंडे (3.1 षटकांत 16 धावा देत 3 विकेट) आणि शमल दुर्बुळे (3 षटकांत 8 धावा देत 2 विकेट) यांनी अप्रतिम कामगिरी केली. चामोर्शी ईगल्सने 13.5 षटकांत 6 गडी गमावून 83 धावा करत विजय मिळवला. त्यांच्या विजयात रतन पोटगंटवार (20 धावा, 27 चेंडू), प्रेम बोरकुटे (नाबाद 12 धावा, 14 चेंडू) आणि विशाल झाडे (नाबाद 15 धावा, 19 चेंडू) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. धानौरा रॉयल रायनोसकडून नकुल बोरीकरने अप्रतिम गोलंदाजी करत 4 षटकांत 20 धावा देत 6 विकेट घेतल्या, पण त्याचा संघाला विजय मिळवून देण्यासाठी उपयोग झाला नाही. या सामन्यातील ‘सामनावीर’ पुरस्कार शमल दुर्बुळे याला देण्यात आला. त्याने फलंदाजीत 6 धावा (9 चेंडू) करताना गोलंदाजीत 3 षटकांत केवळ 8 धावा देत 2 विकेट घेतल्या. सामन्यानंतर धानोरा रॉयल रायनोस संघाला सन्मानपूर्वक 1,11,111 रुपयांचा धनादेश देण्यात आला. सामन्यानंतर आयोजित बक्षीस वितरण समारंभात शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि गडचिरोली नगरपालिकेचे माजी नगरसेवक सतीश विधाते यांच्या हस्ते विजेत्या संघाचा सत्कार करण्यात आला. GDPL-2025 अंतर्गत होणाऱ्या आगामी सामन्यांसाठी क्रिकेटप्रेमींसमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.