यात्राकाळात पत्रकारांना सुरक्षा देण्याची व्हॉईस ऑफ मिडियाची मागणी

79

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

चामोर्शी, ता. २३ : प्रसार माध्यमे हा लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ आहे. विविध स्तरावरील छायाचित्र व बातम्या संकलन करून प्रसिद्धीच्या माध्यमातून प्रकाश झोतात आणण्याचे काम पत्रकार करत असतात. मात्र यात्रा किंवा विविध गर्दीच्या ठिकाणचे छायाचित्र व बातमी संकलन करताना बऱ्याच ठिकाणी पत्रकारांना अडविले जाऊन मज्जाव घातला जातो. त्यामुळे पत्रकारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असते. पत्रकारांसोबत अरेरावी करण्याचे, हुज्जत घालण्याचे प्रकारही घडतात. त्यामुळे यात्रा काळात पत्रकारांना सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी व्हॉईस ऑफ मिडियाच्या चामोर्शी तालुका शाखेच्या वतीने आयोजित सभेत करण्यात आली.

२६ फेब्रुवारी २०२५ पासून महाशिवरात्रीनिमित्त यात्रेला सुरुवात होत असून जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा देवस्थान, आष्टी परीसरातील चपराळा देवस्थान आदी ठिकाणी दरवर्षी मोठी यात्रा भरत असते. यात्रेचा संपूर्ण परिसर भक्तिमय असतो. यात्रेदरम्यान विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. मंदिर परिसरात देवदर्शनासाठी मोठमोठ्या रांगा लागत असतात. मुख्यमंत्र्यापासून तर इतर पदाधिकारी व अधिकारी यांचेही मंदिरात पूजापाठ सुरू असतात. याबाबतची माहिती वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रकाशित करण्यासाठी मंदिरातील छायाचित्रे व बातमी पत्रकारांसाठी महत्वाची आहे. एवढेच नाही तर यात्रे दरम्यान चेंगराचेंगरी, चोऱ्या, दरोडे यासारखे अनेक अनुचित प्रकार घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्याही बाबत वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी पत्रकार आपले कर्तव्य बजावत असतात. अशा परिस्थितीत पत्रकारांवर हल्ले होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. मात्र अशावेळी पोलिस प्रशासन किंवा संबंधित विभागाचे अधिकारी यांच्याकडून पत्रकारांची सुरक्षा होत नाही. पत्रकारांची अवहेलना होत असल्याचे प्रकार अनेक ठिकाणी दिसून आले आहेत. पत्रकारांच्या सुरक्षेसाठी त्यांना सुरक्षा पासची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी व्हॉईस ऑफ मिडिया तालुका चामोर्शी यांच्या वतीने

व्हॉईस ऑफ मिडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांच्या मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष व्यंकटेश दुड्डमवार, तालुकाध्यक्ष पुंडलिक भांडेकर , सचिव विनोद खोबे, उपाध्यक्षा धनराज वासेकर, पांडुरंग कांबळे, भास्कर फरकडे, मार्गदर्शक बबन वडेट्टीवार, कालिदास बनसोड, दीपक रॉय, अयाज शेख, हेमंत उपाध्ये, अशोक खंडारे, गणेश शिंगाडे, कार्याध्यक्ष कालिदास बुरांडे, कार्यवाह प्रकाश घोगरे, कोषाध्यक्ष अरुण गव्हारे, सहसचिव मारोती बारसागडे, प्रसिद्धी प्रमुख उमेश गझलपल्लीवार सदस्य दिलखुष बोदलकर, सुधीर फरकाडे, अमित साखरे, महादेव निकोडे व इतर पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

———————————