ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. ५ : दिरंगी-फुलनार चकमकीमध्ये सी-६० जवानाला ठार करणाऱ्या दोन जहाल माओवाद्यांना बुधवार (ता. ५) गडचिरोली पोलिस व केंद्रीय राखिव पोलिस दलाच्या जवानांनी अटक केली. केलू पांडू मडकाम ऊर्फ दोळवा, (पीपीसीएम, कंपनी क्र. १०) ( वय २६)रा. मुरकुम, पोलिस स्टेशन- तर्रेम, ता. उसूर जि. बिजापूर (छत्तीसगड), रमा दोहे कोरचा ऊर्फ डुम्मी (पार्टी सदस्य, भामरागड दलम) (वय ३२) रा. मेंढरी, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली, अशी अटक करण्यात आलेल्या माओवाद्यांची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार बुधवार (ता. ५) भामरागड पोलिस स्टेशनच्या हद्दीतील आरेवाडा जंगल परिसरामध्ये भामरागड पोलिस स्टेशनचे पोलिस पथक व सीआरपीएफच्या बटालियन क्रमांक ३७ चे पथक माओवादविरोधी अभियान राबवत असताना त्यांना दोन संशयित व्यक्ती फिरत असताना आढळून आल्या. पथकाच्या जवानांनी त्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांची अधिक सखोल चौकशी करण्यासाठी गडचिरोली पोलिस मुख्यालयात आणले असता त्यांनी आपली नावे केलू पांडू मडकाम ऊर्फ दोळवा व रमा दोहे कोरचा ऊर्फ डुम्मी असल्याचे सांगितले. अधिक चौकशी दरम्यान समोर आले आहे की, या दोन्ही व्यक्ती पोलिसांच्या अभिलेखावरील जहाल माओवादी असून घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने ते आरेवाडा जंगल परिसरात रेकी करण्यासाठी दाखल झाले होते. तसेच पोलिस तपासात उघड झाले की, या दोन्ही माओवाद्यांचा ११ फेब्रुवारी २०२५ रोजी दिरंगी-फुलनार जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये एका पोलिस जवानाच्या हत्येमध्ये प्रत्यक्ष सहभाग होता. असे निष्पन्न झाल्याने त्यांना कोठी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. यातील केलू पांडू मडकाम ऊर्फ दोळवाने २०१६ मध्ये पामेड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन सन २०१७ पर्यंत काम केले. २०१७ मध्ये सीसीएम मिलिंद तेलतुंबडेच्या गार्डमध्ये बदली होऊन २०२१ पर्यंत काम केले. २०२१मध्ये मर्दिनटोला चकमकीमध्ये जखमी झाल्याने माड एरीयातील काकुर जंगल परिसरात राहून फेब्रुवारी २०२२ पर्यंत उपचार घेतले. फेब्रुवारी २०२२ पासून पश्चिम ब्युरो स्टाफ टिममध्ये आवश्यकतेनुसार डिकेएसझेडसी रुपेश व प्रभाकरसोबत ऑगस्ट२०२३पर्यंत काम केले. ऑगस्ट २०२३ मध्ये कंपनी क्र. १० मध्ये बदली होऊन एप्रिल २०२४ पर्यंत काम केले. एप्रिल २०२४ पासून डिकेएसझेडसी प्रभाकर व कंपनी क्र. १० मध्ये आवश्यकतेनुसार डिसेंबर २०२४ पर्यंत काम केले.डिसेंबर २०२४ मध्ये पीपीसीएम (प्लाटुन पार्टी कमिटी मेंबर) पदावर पदोन्नती होऊन कंपनी क्र. १० मध्ये आजपर्यंत काम केले. त्याचा आजपर्यंत एकूण ५ गुन्ह्यांमध्ये सहभाग असून त्यामध्ये ४ चकमक, व १ जाळपोळ या गुन्ह्याचा समावेश आहे. रमा दोहे कोरचा ऊर्फ डुम्मी २०११पासून चेतना नाट्यमंचमध्ये भरती होऊन २०१३ पर्यंत काम केले. २०१३ पासून २०२३ पर्यंत गट्टा दलममध्ये सदस्य पदावर काम करत होती. २०२३ मध्ये भामरागड दलममध्ये बदली होऊन आजपर्यंत कार्यरत होती. तिच्यावर आजपर्यंत एकूण १२ गुन्हे दाखल असून त्यामध्ये ८ चकमक व ४ खून आदी गुन्ह्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र शासनाने केलू पांडू मडकाम ऊर्फ दोळवा याच्या अटकेवर ६ लाख, तर रमा दोहे कोरचा ऊर्फ डुम्मी हिच्या अटकेवर २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.ही कारवाई विशेष पोलिस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील, पोलिस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, सीआरपीएफचे कमांडंट दाओ इंजिरकान कींडो, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, पोलिस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे व भामरागडचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनात भामरागड पोलिस स्टेशनच्या जवानांनी पार पाडली. विशेष म्हणजे जानेवारी २०२२ ते आतापर्यंत एकूण ९२ माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलिस दलास यश आले आहे.










